नागपूर - प्लॉटच्या मालकीहक्काचा वाद टोकाला गेल्यानंतर राज्यभरात चर्चेला आलेल्या एमआयडीसी वादग्रस्त प्रकरणातील महिलेच्या घराला शनिवारी रात्री आग लागल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
वादग्रस्त मालमत्तेचा कब्जा सोडावा म्हणून राज्य कामगार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव तसेच पंजू तोतवानी या स्थानिक भाजप नेत्यांसह पाच जणांवर या महिलेने अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सर्वच्या सर्व आरोपी फरार आहे. राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने हे प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनातही चर्चेला आले होते. आता ते थंड पडल्याने महिलेच्या इंद्रप्रस्थ नगरातील एका घराला आग लागल्याने शनिवारी रात्री पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रकरण एवढे गाजले असताना आरोपी आग लावून स्वत:च्या अडचणी वाढवणार काय, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच दोन राजकीय गट एकमेकांच्या विरोधात उतरल्याने परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता आग लावली की लागली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत.