लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा योग्य उपचार न घेतल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करून संतप्त नातेवाईकांनी एका हॉस्पिटलमध्ये आग लावली. डॉक्टरलाही मारहाण केली. या प्रकारामुळे पाचपावलीतील होप हॉस्पिटलमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता पाली नामक कोरोनाग्रस्त महिलेवर होप हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपासून उपचार सुरू होते. तिला डॉक्टरांनी शनिवारी सकाळी १०च्या सुमारास मृत घोषित केले. पैशासाठी तगादा लावणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाकडून योग्य उपचार न झाल्यामुळेच सुनीता यांचा मृत्यू झाला, असा आरोप करून सुनीताचे नातेवाईक राकेश पाली, ओमप्रकाश शाहू तसेच त्यांचे ८ ते १० नातेवाइकांनी डॉ. मुरली यांना धारेवर धरले. ते समाधानकारक उत्तरे देत नसल्याने नातेवाईकांच्या भावनांचा भडका उडाला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी डॉ. मुरली टाळाटाळ करीत असल्याने मृत महिलेच्या नातेवाईकांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी डॉ. मुरलीला धक्काबुक्की करून रिसेप्शन काउंटरला आग लावली. प्लायवूडचे काउंटर आणि बेंचवर पेट्रोल टाकल्याने आगीचा भडका उडाला. आगीचा भडका उडताच माजली खळबळ
यावेळी हॉस्पिटलच्या दुसऱ्या, तिसऱ्या माळ्यावर कोरोनाचे रुग्ण, तर खाली त्यांचे नातेवाईक होते. रिसेप्शनमध्ये आगीचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. सायंकाळी डॉ. मुरली यांनी मारहाण करून जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी पाली, शाहू तसेच त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे यांनी लोकमतला सांगितले.
----