नागपूर : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांना आता बेड मिळणे कठीण झाले आहे. मनपा प्रशासनाने यासाठी सहायता कक्ष उघडला आहे. ०७१२-२५६७०२१ या संपर्क क्रमांकाची आणि वेबसाईटची व्यवस्था आहे; मात्र याचा कसलाही फायदा नाही. बेडची संख्या माहीत करून घेण्यासाठी वारंवार कॉल करूनही फोनच उचलला जात नाही. मनपाच्या साईटवर बेड रिकामे दाखवतात, प्रत्यक्षात बेडच शिल्लक नसतात, किंवा रुग्णालये प्रतिसादच देत नाहीत. अखेर दवाखाने शोधत नातेवाइकांना रुग्णाला घेऊन फिरावे लागते, अशी स्थिती आहे.
शहरात अनेकांना याचा वाईट अनुभव आला आहे. जरीपटका येथील कपिल नामक व्यक्तीने आपल्या वडिलांना बेड मिळावा, यासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजता प्रयत्न केले. मनपाच्या सहायता केंद्रावर कॉल केले. कुणीच प्रतिसाद दिला नाही. अखेर ते वडिलांना घेऊन पाचपावलीच्या एनएमसी रुग्णालयात गेले. बेड नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर मेयो, मेडिकल यासह अनेक खासगी रुग्णालयांची दारे वाजविली. नातेवाइकांनीही प्रयत्न केले; मात्र कुठेच बेड मिळाला नाही. मनपाच्या साईटवर मदर ॲंड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये तीन बेड दाखिवले जात होते; मात्र तेथील फोन कोणी उचलतच नव्हते. जामठा येथील नॅशनल कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये गुरुवारपासून १०० बेडचे कोरोना रुग्णालय सुरू होणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत होते. त्यांच्याही टोल फ्री क्रमांकावर आणि फोन नंबरवर प्रतिसाद मिळाला नाही.
...
गृहविलगीकरणातील रुग्णांना रेमडेसिविर नाही
जिल्हा प्रशासनाने औषध विक्रेत्यांना रेमडेसिविर विक्रीवर बंदी केली आहे. रेमडेसिविर फक्त कोविड रुग्णालयांनाच थेट पुरविण्याचे आदेश आहेत. खरे तर रुग्णालयात बेड नसल्याने अनेक जण घरी राहूनच उपचार घेत आहेत. डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन लिहून देतात. पण ते मिळत नसल्याने अनेकांची मने धास्तावली आहेत. माध्यमात काम करणारे गिरीश झुनके हेसुद्धा आपल्या वडिलांच्या उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनकरिता फिरत आहेत. त्यांनी मनपा कार्यालय, एफडीएपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धाव घेतली. तरीही रेमडेसिविर इंजेक्शन मिळालेच नाही.
...
रुग्णांना सोडले मृत्यूच्या वाटेवर
एनजीओ ॲक्शन कमिटीचे सचिन बिसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या परिचयातील अनेक जण रुग्णांना बेड आणि औषधे मिळविण्यासाठी भटकत आहेत; मात्र अडचणी येत आहेत. रुग्णालयात दाखल झाल्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही, तर दुसरीकडे रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. यामुळे नातेवाइकांच्या भावना संतप्त आहेत. ही परिस्थिती पाहिल्यावर वाटते, प्रशासनाने रुग्णांना मृत्यूच्या वाटेवर तर सोडले नाही ना ?
...