एफआयआर रद्द करण्यास नकार नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी लोकप्रिय पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. परिणामी हनीसिंगला जोरदार दणका बसला आहे. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व अन्य एक गायक बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदविला आहे. सार्वजनिकरीत्या गाता येणार नाही व संस्कारित व्यक्ती ऐकू शकणार नाही अशा अश्लील शब्दांमध्ये गाणी गायल्याचा हनीसिंगवर आरोप आहे. त्याची गाणी यूट्युबवर उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे. हा एफआयआर रद्द करण्यासाठी हनीसिंगने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी हनीसिंगची विनंती अमान्य करून अर्ज निकाली काढला. परंतु, पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर हनीसिंग या प्रकरणातून आरोपमुक्त होण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज दाखल करू शकेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. पोलिसांनी सुरुवातीला जब्बल यांच्या तक्रारीवर सहा महिन्यांपर्यंत काहीच कारवाई केली नव्हती. त्यानंतर जब्बल यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. पोलीस आयुक्तांनीही समाधानकारक कारवाई केली नाही. परिणामी, त्यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जेएमएफसी न्यायालयाने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे सांगून तक्रार खारीज केली होती. त्यानंतर जब्बल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी दोन्ही गायकांविरुद्ध एफआयआर नोंदविला. हनीसिंगतर्फे अॅड. अतुल पांडे, जब्बल यांच्यातर्फे अॅड. रसपालसिंग रेणू तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
हनीसिंगला हायकोर्टाचा दणका
By admin | Updated: March 1, 2017 02:33 IST