गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात प्रकल्प राबविला जात आहे. यात विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी २२२.०९ कोटींच्या ‘होम-स्वीट-होम’ प्रकल्पाचा समावेश आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु निर्धारित कालावधी संपल्यावर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जवळपास २५ कोटींचा खर्च झाला असून, आजवर फक्त ९ टक्के काम झाले आहे.
होम-स्वीट-होम प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागांत प्रकल्पग्रस्तांसाठी १०२४ सदनिकांचे बांधकाम केले जात आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व मध्यमवर्गीयांसाठी बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत; परंतु कामाची गती बघता स्वीट होमचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रकल्पासाठी जमीन वा भूखंड अधिग्रहित करण्यात आलेल्या नागरिकांचे येथे पुनर्वसन केले जाणार आहे; परंतु अजूनही जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मोबदला मिळाला नसल्याची प्रकल्पग्रस्तांची तक्रार आहे. वादामुळे रस्त्यांच्या कामाला अजूनही गती आलेली नाही. काहींचा प्रकल्पाला विरोध असून, गरज नसताना रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आल्याने विस्थापितांची संख्या वाढल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटीने लवकरच हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
कालावधी संपल्यावर सुरुवात
८ मार्च २०१९ रोजी या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. १८ महिन्यांत म्हणजेच ८ सप्टेंबर २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु या कालावधीत प्रकल्पाच्या कामाला सुरुवातच झाली नाही. त्यामुळे ३० जून २०२१ पर्यंत या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपल्यावर जेमतेम ९ टक्के काम झाले. आता पुन्हा ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली; परंतु अजूनही प्रकल्पाचे काम संथच आहे.
....
असा आहे होम स्वीट होम प्रकल्प
-१०२४ सदनिकांचे बांधकाम
-८ मार्च २०१९ ला कार्यादेश
-प्रकल्पावरील खर्च -२२२.०९ कोटी
-प्रकल्पाचा कालावधी -१८ महिने (सप्टेंबर २०२० ला मुदत संपली, दुसऱ्यांदा मुदतवाढ)
- तीन बहुमजली इमारती उभारणार
....
अपेक्षित स्मार्ट सुविधा
-सौरऊर्जा प्रणाली
-रेन वॉटर हार्वेस्टिंग
-हरित इमारत संकल्पना
-मलनिस्सारण केंद्र
- मुलांना खेळण्यासाठी मैदान
- उद्यान
- जॉगिंग ट्रॅक
- मैदान
-लिफ्ट सुविधा
-व्यावसायिक दुकाने