उमेश बगाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोपनागपूर : इतिहासामधील विविध घटनांसंदर्भात विविध गृहितके सिद्ध करण्यासाठी इतिहासकारांकडून आवश्यक त्याच बाबी घेण्यात येतात. यामुळे चुकीचा इतिहास मांडल्या जातो. त्यामुळे इतिहासकारांनी आपापल्या सोयीने अन्वयार्थ लावू नये, असे मत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्यावतीने दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी डॉ. बगाडे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक लेखन पद्धती’ या विषयावर व्याख्यानमालेतील दुसरे व अंतिम पुष्प गुंफले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे व कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. इतिहासकारांमध्ये अन्वयार्थाची बजबजपुरी आहे. परंतु संदर्भापासून कोणतेही तथ्य बाजूला काढता येणार नाही. तथ्याला नेहमी चौकटीतच ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. त्यांनी इतिहास हा तात्त्विक चौकटीतच लिहिला. त्यावेळी प्रचलित असलेल्या इतिहास लेखनातील अनेक प्रथांना त्यांनी धक्का दिला व वास्तव मांडले, असे प्रतिपादन डॉ. बगाडे यांनी केले.इतिहासातील सत्य शोधताना मनात नेहमी शंका राहिल्या पाहिजेत. कारण शंकेमधूनच सत्य समोर येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्य शोधण्यासाठी चिकित्सा आवश्यक असते. इतिहास हा वस्तुनिष्ठता व व्यक्तीनिष्ठता यांच्यातून समोर यायला हवा. वस्तुनिष्ठता तर मानवतावादीच हवी असेदेखील ते म्हणाले. डॉ.आंबेडकर यांनी समाजशास्त्राचे लेखन करण्यासाठीदेखील सिद्धांतांची सामुग्री दिली आहे. त्यांनी परंपरागत चौकट तोडून इतिहास लेखन केले असले तरी त्यांची गृहितकांची पद्धती ही पूर्णत: शास्त्रीयच होती. तथ्य संदर्भापासून बाजूला काढता येणार नाही, या बाबासाहेबांच्या विचारांचे अनेक इतिहासकार आता पालन करत आहेत, अशी माहितीदेखील डॉ.उमेश बगाडे यांनी दिली. डॉ.आगलावे यांनी व्याख्यानमालेतील विषयाचे महत्त्व विषद केले. या व्याख्यानमालेला विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
इतिहासकारांनी सोयीने अन्वयार्थ लावू नये
By admin | Updated: September 21, 2015 03:18 IST