टोलनाक्याजवळ अडवितात वाहने : महामार्ग पोलीस विशेष मोहिमेचा फज्जालोकमत न्यूज नेटवर्कधामणा : महामार्ग सुरक्षा पथकाच्यावतीने सध्या महामार्ग पोलीस विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांसोबतच अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, खुर्सापार (खापरी) येथील महामार्ग सुरक्षा पथकाने या मोहिमेच्या मूळ उद्देशाला ‘खो’ देत नागपूर- अमरावती मार्गावरील गोंडखैरी शिवारात असलेल्या टोलनाक्याजवळ तसेच हिंगणा बायपास, बाजारगाव, कोंढाळी परिसरात वसुली मोहीम सुरू केली आहे. महामार्ग सुरक्षा पथकाला या मोहिमेंतर्गत वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, खुर्सापार येथील महामार्ग पथकातील सदस्य मागील चार दिवसांपासून रोज सायंकाळी ४ वाजतापासून ६.३० वाजेपर्यंत गोंडखैरी शिवारातील टोलनाका, हिंगणा बायपास, बाजारगाव, कोंढाळी परिसरात रोडच्या कडेला उभे राहतात आणि ट्रक, ट्रॅव्हल्स, कार यासह अन्य जड वाहने तसेच दुचाकी व तीनचाकी वाहनांना थांबवितात. संबंधित वाहनचालकांना कारवाई करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळतात, अशी माहिती अनेक वाहनचालकांनी दिली. सदर प्रतिनिधीने गोंडखैरी शिवारातील टोलनाक्याची पाहणी केली असता, हा प्रकार आढळून आला. खुर्सापार येथील सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षक पी. जी. ठाकरे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, हा प्रकार आम्ही करीत नाही. पुणे व मुंबई येथील सुरक्षा पथक खुर्सापार येथे आले आहे. त्या पथकातील सदस्यांनी हा प्रकार केला असावा, असे मोघम उत्तर ठाकरे यांनी दिले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत एएसआय वराड, मारोती शेंडगे, म्हात्रे, नागरगोजे हजर होते.
महामार्ग सुरक्षा पथकाची वसुली मोहीम
By admin | Updated: May 25, 2017 01:56 IST