नागपूर : गोवंशातील २२ जनावरांचा ताबा कायम रहावा आणि त्यांच्या देखभालीसह इतर बाबींचा खर्च मिळावा याकरिता श्रीकृष्ण गोसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कश्यप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने बुटीबोरी पोलीस व जनावरांचे मालक वकार अहमद कुरेशी यांना नोटीस बजावून ३० जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
संबंधित जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती. त्यामुळे बुटीबोरी पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी सर्व जनावरे जप्त करून ती देखभालीसाठी श्रीकृष्ण गोसेवा संस्थेकडे सोपवली. तसेच, आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला. दरम्यान, संस्थेने जनावरांचा ताबा कायम रहावा आणि त्यांच्या देखभालीसह इतर बाबींचा खर्च मिळावा याकरिता सुरुवातीला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज ११ नाेव्हेंबर रोजी फेटाळला गेला. परिणामी, संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संस्थेतर्फे ॲड. राजेंद्र डागा, ॲड. मोहित खजांची व ॲड. आकाश जयस्वाल यांनी कामकाज पाहिले.