नागपूर : माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र व काँग्रेस नेते डॉ. अमोल देशमुख यांच्याविरुद्ध विद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाहनाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.
विद्या शिक्षण प्रसारक मंडळाने डॉ. अमोल देशमुख यांच्याविरुद्ध वाहनाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करणारी तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली होती. सदर तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका डॉ. देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्या. विनय देशपांडे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यानुसार, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्या कारवाईला सहायक धर्मादाय आयुक्तांकडे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे सचिवपद अद्याप कायम असल्याने वाहनाचा गैरवापर केल्याचा दाखल केलेला गुन्हा अपरिपक्व आहे, असा दावा डॉ. देशमुख यांनी केला. याशिवाय दाखल करण्यात आलेली तक्रार ही खोटी व निराधार आहे. तसेच ही तक्रार त्यांचे वडील रणजित देशमुख व भाऊ आमदार आशिष देशमुख यांच्यातील वादातून झाली आहे.
सरकारी पक्षानुसार डॉ. देशमुख हे विद्या प्रसारक मंडळाचे सचिव होते. त्यांच्याकडे चल व अचल मालमत्तेचा ताबा होता. त्यांनी त्यांच्या नावावर इनोव्हा क्रिस्टा गाडी घेतली होती. त्यांचा सचिवपदाचा कार्यकाळ झाल्यानंतरही त्यांनी वाहनाचा ताबा कायम ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध् पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर सरकारी पक्षाचा दावा अमोल देशमुख यांनी फेटाळून लावला. कारचा ताबा ठेवण्यात कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांच्याकडून काहीही वसूल करण्यासारखे नाही. याशिवाय ट्रस्टचा दुरुस्ती अहवाल अद्यापही धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. तसेच सचिवपदावरून काढण्याच्या कारवाईला आव्हान दिले असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे कोर्टाला नमूद करण्यात आले. या बाबींची दखल घेत हायकोर्टाने डॉ. अमोल देशमुख यांच्याविरुद्धचा दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय दिला. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राहुल भांगडे यांनी बाजू मांडली.