नागपूर : कोळसा व्यापारी मंजित भाटिया यांच्या रामदासपेठमधील फ्लॅटमध्ये झालेल्या साहसी चोरीचा अखेर उलगडा झाला आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणीने मुलाच्या मदतीने या चोरीला मूर्त रूप दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी सविता देवेंद्र पानेकर (३४), मुलगा पीयूष पानेकर (१८), तसेच अब्दुल फईम अब्दुल खान हनीफ (२०), रा. गुलशननगर यांना अटक केली आहे. आसिफ नावाचा अन्य एक आरोपी फरार आहे. रामदासपेठमधील साईअंकुर अपार्टमेंटमध्ये राहणारे मंजित भाटिया कुटुंबासह होळीच्या सणासाठी इंदोरला गेले होते. ही संधी साधून २८ मार्चच्या रात्री त्यांच्या ५०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून साडेतीन लाख रुपयांचे दागिने, तसेच हिरेजडित दागिन्यांसह १८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. सीताबर्डी पोलिसांच्या चौकशीमध्ये दोन युवक यात सहभागी असल्याचे निदर्शनास आले. भाटिया यांचे जावई करण भाटिया हे याच अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्येही दोन वेळा चोरी झाली आहे. दुसरी घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. सविता आणि तिची बहीण या दोघीही भाटिया आणि जायसवाल यांच्या घरी काम करतात. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांना सवितावर संशय होता. तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. मात्र, कसलीही माहिती न दिल्याने पोलीस काहीच करू शकले नव्हते. या घटनेसंदर्भातही पोलिसांनी तिची पुन्हा चौकशी केली. तिचा मुलगा पीयूष यालाही ताब्यात घेतले. सीसीटीव्हीने पीयूषची पोलखोल झाली. यानंतर फहीमलाही अटक करण्यात आली.
कुणाल जायसवाल यांच्याकडे झालेल्या चोरीत सापडल्यावर सविता आणि तिच्या बहिणीने काम सोडले होते. सविताने काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटमधील एका कर्मचाऱ्याला फोन करून भाटिया यांच्या बाहेरगावी जाण्यासंदर्भात माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर मुलगा आणि फईम यांना फ्लॅटची माहिती देऊन चोरी करण्यासाठी पाठविले होते. दोघांनी तेथून लहान तिजोरीच उचलून आणली होती. घरी आणून ती आसिफच्या मदतीने फोडली. तो अट्टल गुन्हेगार आहे. त्यांना पोलिसांनी पकडल्यावर त्यातील दोन लाख रुपये जमानतीसाठी म्हणून त्याने स्वत: ठेवून घेतले. पीयूष आणि फईम हे सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. त्यांच्याकडून १२ लाख ४१ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, एपीआय किशोर शेरकी, पीएसआय प्रवीण सुरकर, एएसआय विनोद तिवारी, हवालदार शंकर कोडापे, शिपाई प्रफुल मानकर, ओमप्रकाश भारतीय, विशाल अंकलवार, प्रीतम यादव, प्रशांत भोयर, रमन खैरे, रोहित रामटेके, विक्रम सिंह यांनी केली.
...
दागिने लपविले होते खड्ड्यात
सवितासुद्धा एखाद्या अनुभवी गुन्हेगारासारखीच आहे. दागिने आणि रक्कम तिने घरातच खड्डा करून जमिनीत पुरून ठेवली होती. दोन दिवसांच्या चौकशीनंतर आणि घराचा कोपरा न कोपरा तपासल्यावरही दागिने सापडले नाहीत. मात्र, मुलाने कबुली दिल्यावर दागिने हस्तगत करण्यात आले. सविताने यापूर्वीही अशा चोऱ्या केल्या असाव्यात, अशी शंका पोलिसांना आहे.