लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/पारशिवनी/खात : नागपूर जिल्ह्यातील काही भागात जाेरदार तर काही भागात हलक्या स्वरूपात वादळी पावसाने हजेरी लावलीे. शनिवारी (दि. १०) सायंकाळी काेसळलेल्या या अवकळी पावसामुळे संत्रा, माेसंबी व आंब्याचे तसेच भाजीपाल्याच्या विविध पिकांसह काही प्रमाणात गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले. वादळामुळे रामटेक शहरासह काही गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. शिवाय विजांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.
रामटेक शहरासह तालुक्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी पावसाच्या जाेरदार सरी बरसायला सुरुवात झाली. वादळामुळे शहरात एक तास तर ग्रामीण भागात दीड ते दाेन तास वीजपुरवठा खंडित झाला हाेता. पाऊस सुरू हाेताच शहरातील गुजरी बाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची व विक्रेत्यांची तारांबळ उडाली हाेती. पावसाचा जाेर तासभर कायम हाेता.
या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यात संत्रा, मोसंबी व भाजीपाल्यासह गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले. तालुक्यातील बडेगाव परिसरात साेसाट्याचा वारा आणि मेघगर्जनामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यामुळे त्यांची सुरक्षितस्थळी जाण्यासाठी धावपळ सुरू झाली हाेती. रात्री ८.३० वाजेपर्यंत ढगाळ वातावरण असले तरी या भागात पावसाच्या सरी बरसल्या नाहीत. मात्र, जाेरदार पाऊस काेसळण्याची शक्यता बळावली हाेती.
दरम्यान, कळमेश्वर शहर व तालुक्यातील काही भागात सायंकाळी ६ वाजतापासून वादळाला तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली हाेती. या पावसामुळे तालुक्यात पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. पारशिवनी शहरासह परिसरातील काही गावांमध्ये वादळासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. माैदा तालुक्यातील खात परिसरात वादळी पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने आंब्याचे माेठे नुकसान झाले. हिंगणा शहर व परिसरात साेसाट्याचा वारा वाहत हाेता, मात्र पावसाच्या सरी बरसल्या नाहीत.