चौकशी समितीची तारीख : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण नागपूर : पुणे येथील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करीत असलेले सेवानिवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीसमक्ष माजी महसूल मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सादर केलेल्या दोन अर्जांवर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे. खडसे यांनी एका अर्जाद्वारे पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांना उलटतपासणीसाठी समितीसमक्ष हजर करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या अर्जामध्ये चौकशी समितीने शासनाद्वारे निर्धारित कक्षा ओलांडल्याचा दावा करून चौकशीसाठी नव्याने मुद्दे निश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे. हे दोन्ही अर्ज मंगळवारी समितीसमक्ष सादर करण्यात आले. त्यानंतर समितीने या अर्जांवर बुधवारी सुनावणी करण्याचे सूचित केले होते. परंतु, बुधवारी समितीने काही कारणांमुळे सुनावणीसाठी गुरुवारची तारीख दिली. समितीने खडसे यांची तपासणी मंगळवारीच पूर्ण केली असून चौकशी येथेच संपते की लांबते हे अर्जांवरील निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी ही समिती स्थापन करून चौकशी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. दरम्यान, विविध कारणांनी समितीला तीनदा मुदतवाढ देण्यात आली. महसूल मंत्री असताना खडसे यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून भोसरी येथील ‘एमआयडीसी’ची जमीन अत्यंत कमी किमतीत म्हणजे, केवळ ३ कोटी ७५ लाख रुपयांत पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावावर केली. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत यापेक्षा दहापट जास्त आहे, असा आरोप आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर समिती स्थापन करण्यात आली. खडसे यांच्यातर्फे वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे तर, ‘एमआयडीसी’तर्फे अॅड. चंद्रशेखर जलतारे कामकाज पहात आहेत.(प्रतिनिधी)
एकनाथ खडसे यांच्या अर्जांवर आज सुनावणी
By admin | Updated: March 2, 2017 02:31 IST