-डेंग्यूला कारणीभूत डास?
डासांच्या चाव्याद्वारे डेंग्यूचे संक्रमण पसरते. सर्व उष्णकटिबंधात याचे रुग्ण आढळून येतात. ‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासांच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि अनियोजित शहरी विकासामुळे डासांची घनता वाढते.
-सामान्य लक्षणे कोणती?
प्रत्येक व्यक्तीमध्ये डेंग्यूची लक्षणे वेगवेगळी दिसून येऊ शकतात. हा सौम्य ‘फ्लू’सारखा दिसून येतो. यात डोकेदुखी, अंगदुखी आणि सौम्य ताप येतोे. काही प्रकरणांमध्ये याची गंभीर लक्षणे दिसून येतात. रक्तदाब कमी होणे, रक्ताच्या प्लेटलेटमध्ये तीव्र घट आदी लक्षणे चिंता वाढविणारी ठरतात.
-डेंग्यू तापाची तीव्र लक्षणे?
१०४ डिग्रीपर्यंत ताप येणे, डोकेदुखी, स्नायू, हाडे आणि सांधेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्याच्या मागे वेदना होणे आणि शरीरावर पुरळ येणे आदी लक्षणे दिसून येतात. बहुतांश लोक एका आठवड्यापर्यंत बरे होतात. काहींमध्ये तीव्र लक्षणे दिसतात. याला गंभीर डेंग्यू, डेंग्यू हेमोरॅजिक ताप किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम असेही म्हटले जाते. शरीरात रक्तस्राव, अवयवाचे काम करणे बंद झाल्याने मृत्यूही होऊ शकतो.
- तीव्र डेंग्यू तापाचा इशारा?
ताप कमी झाल्यावर एक किंवा दोन दिवसांनंतर तीव्र डेंग्यू तापाच्या इशाऱ्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. यात पोटात तीव्र वेदना, सतत उलट्या होणे, हिरड्या किंवा नाकातून रक्त येणे, मूत्र व मलविसर्जनातून रक्त येणे, उलटीमधून रक्त पडणे, चिडचिडेपणा, अस्वस्थता, तीव्र थकवा आणि श्वास लागणे हे धोक्याचे इशारे आहेत. अचानक ताप गायब होणे, अचानक प्लेटलेट्समध्ये कमी होणे, सतत उलट्या होणे आणि पोटदुखी होणे ही निश्चित लक्षणे आहेत.
-डेंग्यू तापाचे निदान कसे करावे?
डेंग्यूचा ताप मलेरिया, झिका विषाणूचा संसर्ग, व्हायरल हिपॅटायटीस, चिकनगुनिया यासारखा असू शकतो. मेंदूचा हा संसर्ग ‘मेनिंगोएनसेफिलायटिस’ सारखा देखील दिसून येतो. यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर आवश्यक त्या चाचण्या गरजेच्या असतात. ‘एनएस १ अँटिजन’ ही रक्त तपासणी अनिवार्य ठरते. तापाच्या एक-दोन दिवसांनंतर ‘आयजीएम अँटिबॉडीज चाचणी पॉझिटिव्ह येते. रुग्ण साधारण एक आठवड्यापर्यंत पॉझिटिव्ह राहतो. डेंग्यूच्या संसर्गाची ही देखील वैशिष्ट्ये आहेत.
-डेंग्यूच्या इतरही चाचण्या?
प्लेटलेटची तपासणी करण्यासाठी ‘कम्प्लिट ब्लड टेस्ट’ करावी लागते. कारण, प्लेटलेटची कमी ही चिंतेची बाब ठरू शकते. याशिवाय, यकृताचे कार्य, मूत्रपिंडाचे कार्य, श्वसन प्रणाली आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी कार्याच्या तपासणीची गरज पडते.
-डेंग्यू विषाणूचे विविध प्रकार
डेंग्यू विषाणूचे ‘डेन १, २, ३ व ४’ असे चार प्रकार आहेत. यात एका प्रकारच्या विषाणूच्या संसर्गापासून बरे झाल्यानंतर, त्यास आयुष्यभर त्यापासून संरक्षण मिळते, परंतु दुसऱ्या प्रकारच्या विषाणूचा धोका राहतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात डेंग्यूची चार वेळा लागण होण्याची शक्यता असते.
-डेंग्यू तापावर उपचार काय आहेत?
सध्या डेंग्यूवर निश्चित उपचार नाहीत. लक्षणे पाहून उपचार केले जातात. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णाला डासमुक्त ठिकाणी हलवावे. भरपूर प्रमाणात द्रव (फ्ल्यूड्स) पदार्थ द्यावे. रुग्णाला विश्रांती द्यावी. पेरासिटेमॉल व हलका आहार उपयुक्त ठरतो. रुग्णावर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयात हलविण्याची गरज पडते. विशेषत: प्लेटलेट्स सतत कमी होत असतील तर काही प्रकरणांमध्ये ‘इंट्रावेनस फ्ल्यूड्स’, ‘प्लेटलेट ट्रान्सफ्यूजन’ तर काही प्रकरणांमध्ये रक्तही देण्याची गरज पडते.