गैरहजर महिलेला कामावर दाखवले : बदल्यात मागितली लाचनागपूर : कर्तव्यावर नसलेल्या महिलेची हजेरी लावून त्या बदल्यात तिला चार हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या प्रभारी आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी सकाळी अटक केली. खिलावन गुणाराम लांजेवार (वय ३५) असे त्याचे नाव आहे. लांजेवार सफाई कामगार असून, सध्या त्याच्याकडे आरोग्य निरीक्षकाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कामावर येणाऱ्यांंची नोंद घेण्याची महत्वपूर्ण भूमिका तो वठवित होता. त्याला एसीबीच्या जाळ्यात अडकवणारी फिर्यादी महिला (वय ४८) महापालिकेत सफाईचे काम करते. ती सप्टेंबर, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात काही दिवस कामावर हजर नव्हती. १६ नोव्हेंबरला ती कामावर हजर झाली. आरोपी लांजेवारने तिला गैरहजर असलेल्या दिवशी कामावर हजर असल्याच्या नोंदी केल्या होत्या. त्यामुळे तिला गैरहजर असूनही पगार मिळाला. त्याची जाणीव करून देत लांजेवारने तिच्यामागे ४ हजार रुपयांची लाच देण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी महिलेने एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार नोंदवली. अधीक्षक राजीव जैन यांनी तक्रारीची शहानिशा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुरुवारी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या कर्मचाऱ्यांंसमोर फिर्यादी महिलेने लांजेवारला लाचेची रक्कम देण्याची तयारी दाखवून त्याच्यासोबत बोलणी केली. ४ हजार रुपये जास्त होते, काही कमी करा, असे म्हटले. शेवटी तो ३ हजार लाच घ्यायला तयार झाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ६.३०ला एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचेचे ३ हजार रुपये स्वीकारताना लांजेवारच्या मुसक्या बांधल्या. त्याला लाच घेताना पकडल्याचे कळताच संबंधित वर्तुळात खळबळ उडाली. लांजेवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
आरोग्य निरीक्षक एसीबीच्या कोठडीत
By admin | Updated: November 21, 2015 03:07 IST