- आचार्य सिद्धांतसागर यांचे ऑनलाइन मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री दिगंबर जैन धर्मतीर्थ ट्रस्टच्या वतीने विश्व शांती वर्धमानोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात ऑनलाइन मार्गदर्शन करताना आचार्यश्री सिद्धांतसागर गुरुदेव यांनी ज्यांना निरोगी व सदृढ आरोग्य हवे, त्यांनी दररोज भगवंताला अभिषेक घालण्याचे आवाहन केले. भगवंताच्या भक्तीपासून व साधूसंतांपासून जो दूर राहतो, तो रोगी होतो. पुण्यकर्म कमकुवत असतील तर रोग येतील. भगवान जिनेंद्रांच्या आराधनेने सर्व सुखांची प्राप्ती होते. गुरुजनांची कृपा असेल तर पाप कर्मांपासून मुक्ती मिळते, असे आचार्यश्री यावेळी म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना आचार्यश्री सुविधीसागर गुरुदेव यांनी, मास्क लावल्याने आपली आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची सुरक्षा निश्चित होते. त्यामुळे, गरजेपेक्षा जास्त जनसंपर्कापासून स्वत:चा बचाव करा. कोरोनाची चर्चा न करता धर्मध्यानाची चर्चा करा. आसनस्थ होऊन स्वाध्याय पठन करा, साधूसंतांचे रक्षण करा, घरी राहून साधूच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. जेथे औषधे काम करत नाहीत तेथे सद्भावना काम करते, असे सुविधीसागर गुरुदेव यावेळी म्हणाले. यावेळी आचार्यश्री गुप्तिनंदी गुरुदेव यांनीही मार्गदर्शन केले. गणिनी आर्यिका आस्थाश्री माताजी यांनी सूत्रसंचालन केले.
..............