राहुल अवसरे नागपूरमुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला आज गुरुवारी सकाळी ६ की ७ वाजता फाशी देण्यात येणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात सकाळी ७ वाजता फाशी देण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी विधी आयोगाने कारागृह नियमावलीचा आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचा हवाला देऊन मे ते आॅगस्ट या महिन्यात दिली जाणारी फाशी सकाळी ६ वाजताच द्यावी, असा उल्लेख आपल्या अहवालात केलेला आहे. मात्र, फाशीची ही संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त ४० मिनिटात नियमानुसार पूर्ण करावी लागणार आहे. मृत्युदंडाच्या संदर्भात देशात समान नियम असावेत, यासाठी भारताच्या विधी आयोगाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ आणि कारागृह नियमावलीचा अभ्यास करून मौलिक शिफारशी केल्या. आरोपीला कोणत्या काळात कोणत्या वेळी फाशी दिली जावी, असा त्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विधी आयोगाच्या अहवालाच्या परिच्छेद ८७२ मध्ये वेळेबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात सकाळी ८ वाजता, मार्च, एप्रिल, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये सकाळी ७ वाजता आणि मे ते आॅगस्टमध्ये सकाळी ६ वाजता फाशी दिली जावी, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार याकूबला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. कारागृह अधीक्षक, उपअधीक्षक यांनी फाशीच्या कैद्याच्या कोठडीत जाऊन फाशी दिल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीबाबत खात्री करावी, त्याला डेथ वॉरंट वाचून दाखवावा, इच्छा आणि अन्य संदर्भातील विविध दस्तऐवजावर त्याच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात, त्यानंतर अधीक्षकाने फाशी यार्डकडे जावे, उपअधीक्षकाच्या उपस्थितीत फाशी दिली जाणाऱ्या कैद्याचे दोन्ही हात पाठमोरे करकचून बांधले जावे, पायात दंडाबेडी असावी, उपअधीक्षकाच्याच देखरेखीत त्याला फाशी यार्डकडे घेऊन जावे, त्याच्या सभोवताल मुख्य वॉर्डरसह सहा वार्डरचा गराडा असावा, त्यापैकी दोघांनी पुढे, दोघांनी मागे राहावे आणि एकाने त्याचे दोन्ही हात पकडून ठेवावे. फाशी यार्डाच्या ठिकाणी अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने अधीच नेमून दिलेल्या आपापल्या जागेवर राहावे. कारागृह अधीक्षकाचा असेल शेरा नागपूर : फाशी देण्यापूर्वी याही ठिकाणी त्याला त्याच्या भाषेत डेथ वॉरंट वाचून दाखविण्यात यावा, त्यानंतर त्याला फाशी देणाऱ्याच्या ताब्यात सोपवावे, वॉर्डरने उचलून त्याला फाशीच्या दोराच्या खाली उभे करावे, त्यानंतर त्याचे दोन्ही पाय घट्ट बांधले जावे, त्याचे डोके आणि चेहरा कॅपने झाकला जावा, त्यानंतर त्याच्या गळ्यात गळफास टाकावा, तो गळ्यात घट्ट असावा, वॉर्डरने फाशी जाणाऱ्या व्यक्तीला सोडताच आणि अधीक्षकाचा इशारा होताच खालची फळी सरकवून त्याला फाशी दिली जावी. जास्तीत जास्त ४० मिनिटात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जावी. अर्धा तासपर्यंत देह फासावर तसाच लटकवत ठेवावा, वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केल्याशिवाय तो खाली उतरवू नये, त्यानंतर कारागृह अधीक्षकाने शिक्षा पूर्ण केली, असा शेरा लिहून आणि स्वाक्षरी करून डेथ वॉरंट परत करावा, असाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.
फाशी सकाळी ६ की ७ वाजता?
By admin | Updated: July 30, 2015 02:43 IST