केंद्रीय विज्ञान विभागाने यापूर्वीच रमन विज्ञान केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली होती पण तत्पूर्वी स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र राज्याची मंजुरी मिळेपर्यंत केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. याबाबत त्यांनी राज्य शासनाला पत्र पाठवले होते. अखेर प्रशासनाकडून परवानगी मिळाल्याने २६ ला केंद्र सुरू होणार आहे. मात्र सुरू होणार असले तरी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
केंद्राचे शिक्षक विलास चौधरी यांनी केंद्राच्या तयारीबाबत भरोसा दिला आहे. त्यांनी केंद्रातर्फे केलेल्या उपाययोजनाविषयी माहिती दिली.
- प्रवेशद्वारावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून कठडे करण्यात आले आहेत.
- प्रत्येक पर्यटकाला सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.
- विज्ञान केंद्र बघण्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हॅण्ड ग्लोव्हज देण्यात येतील.
- केंद्रातील जवळ असलेले प्रयोग थोडे दूर ठेवण्यात आले आहेत.
- केंद्रातही सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.
- केंद्राचे कर्मचारी प्रत्येक वेळी उपस्थित राहणार असून सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत करतील.
- एखाद्याचा हात लागला तर ती जागा वेळेवरच सॅनिटायझर वापरून पुसली जाईल.
सध्या तारामंडळ बंद राहील
विलास चौधरी यांनी सांगितले, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत तारामंडळ सध्यातरी बंद राहणार आहे. मात्र सायन्स ऑन स्फियर सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर सर्व प्रयोग आणि दालन पूर्ववत सुरू होईल. सध्या विद्यार्थी येण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे गर्दी होईल असे वाटत नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीसाठी आम्ही तयार असल्याचा विश्वास चौधरी यांनी दिला.