नागपूर : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना लॉकडाऊनमुळे ऑटोमोबाइल, सराफा, इलेक्ट्रिॉनिक्सची वस्तूंची दुकाने व शोरूम बंद राहणार आहेत. त्यामुळे पूर्वी झालेल्या बुकिंग रद्द करण्याकडे ग्राहकांचा कल असून, शिवाय नवीन बुकिंग आणि वस्तूंच्या विक्रीवर संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यवधींचा व्यापार बुडणार आहे.
गुढीपाडव्याला बाजारात उत्साहाचे वातावरण असते. गुढीपाडवा मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. हा सण अक्षयतृतीया आणि धनत्रयोदशीप्रमाणे नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी शुभ समजला जातो. या दिवशी सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, भांडे, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ग्राहक १५ दिवसांपूर्वी वस्तू खरेदीसाठी बुकिंग करतात. या दिवशी फ्लॅट आणि जमिनीचा मोठा व्यवहार होतो, पण या वर्षी कोरोनामुळे सर्व व्यवहारावर पाणी फेरले गेले आहे. आता तर दुकाने, शोरूम सुरू होण्याच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. गुढीपाडव्याला काही तासांसाठी दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी सर्वच व्यापारी असोसिएशनने मनपा आयुक्त आणि जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे, पण अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.
अनेक जण सराफांकडे आधीच बुकिंग केलेले दागिने गुढीपाडव्याला नेतात, पण शोरूम बंद असल्यामुळे त्यांचीही निराशा होणार आहे. हीच स्थिती ऑटोमोबाइल्स आणि इलेक्ट्रिॉनिक्स क्षेत्राची आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑटोमोबाइल क्षेत्रात उत्साह संचारला होता, पण आता त्याही क्षेत्रात निराशा आहे. नवीन बुकिंग तर येणार नाहीत, पण गाड्यांचे पूर्वीचे बुकिंग रद्द करण्यास ग्राहक सांगत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने लॅपटॉपची विक्री वाढली आहे, याशिवाय या दिवशी अनेकांचा मोबाइल विक्रीवर भर असतो, पण या क्षेत्राचीही निराशा होणार आहे. अनेक व्यावसायिकांनी ऑनलाइन विक्रीवर भर दिला आहे, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात वस्तू पाहून आणि हात लावून खरेदीवर ग्राहकांचा भर असतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.
व्यवसाय प्रभावित होणार
सोमवारपासून काही अटींवर दुकाने सुरू करण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. गुढीपाडवा सणासाठी व्यापाऱ्यांना आधीच बुकिंग मिळत होती, पण लॉकडाऊनमुळे स्थिती विपरित झाली आहे. ज्वेलरीमध्ये ग्राहकांचा दागिना पाहून खरेदीवर भर असतो. शोरूम सुरू न झाल्यास ग्राहकांना खरेदीपासून वंचित राहावे लागेल.
राजेश रोकडे, सराफा व्यावसायिक
फ्लॅट विक्रीला फटका बसणार
गेल्या काही महिन्यांपासून फ्लॅट खरेदीसाठी लोकांकडून विचारण होत होती. शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्याने बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले होते, पण आता लॉकडाऊनमुळे लोक निर्णय घेण्यात असमर्थ आहेत. साइटवर काम सुरू आहे, पण कार्यालय बंद असल्याने ग्राहक येत नाहीत.
गौरव अगरवाला, बिल्डर
लॉकडाऊनमुळे नवीन बुकिंग नाहीत
गुढीपाडव्या ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी मुहूर्ताचा दिवस आहे, पण यंदाही शोरूम बंद राहणार असल्याने लोकांना गाड्यांची डिलिव्हरी देता येणार नाही. या कारणाने अनेक जण गाड्यांचे बुकिंग रद्द करण्यासाठी फोन करीत आहेत, शिवाय नव्याने गाड्यांचे बुकिंग नाही. त्यामुळे विक्रेते संकटात आले आहेत.
डॉ. पी.के. जैन, ऑटोमोबाइल विक्रेते