लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा विरोध वाढत चालला आहे. या निर्णयाविरोधात दररोज धरणे निदर्शने केली जात असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निर्णय रद्द करण्याच्या मागणीचे निवेदने शासनाला पाठवली जात आहेत.
वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी संविधान चौकात बहुसदस्यीय प्रभाग पद्धती विरुद्ध निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात प्रा. राहुल वानखेडे, प्रफुल्ल मानके, विवेक हाडके, मुरली मेश्राम, राहुल दहीकर, धर्मेश फुसाटे, नालंदा गणवीर, मिलिंद मेश्राम, वंदना पेटकर, वर्षा धारगावे, रेखा वानखेडे, सिद्धांत पाटील आदी सहभागी झाले होते.
- प्रभाग पद्धती वाॅर्ड विकासाला अनुकूल नाही
दरम्यान, प्रभाग पद्धती वाॅर्ड विकासाला अनुकूल नसल्याचे मत काँग्रेसचे माजी आमदार अशोक धवड यांनी व्यक्त केले आहे. शासनाने यासंदर्भात पुनर्विचार करावा, प्रभाग पद्धतीच पाहिजे असेल तर जास्तीत जास्त द्वी सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.