लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मंगळवारी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आमदार विकास ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारकस्थळी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, प्रभारी उपायुक्त प्रकाश वराडे आदी उपस्थित होते. शहरातील प्रसिद्ध कलावंत सर्जेराव गलपट यांनी स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेमध्ये स्मारकात उपस्थिती दर्शविली.
मान्यवरांनी स्मारक स्थळावरील स्वामी विवेकानंदांचे जीवनचरित्र दर्शविणाऱ्या सभागृहाची पाहणी केली. सभागृहामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शविणारे म्युरल लावण्यात आलेले आहेत. शिवाय दृकश्राव्य माध्यमातून त्यांचे जीवनचरित्र समजून घेता यावेत यासाठी टीव्ही स्क्रीनही लावण्यात आलेल्या आहेत. मात्र नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ते अद्याप सुरू झालेले नाहीत. प्रशासनिकदृष्ट्या येणाऱ्या अडचणी सोडवून ते सुरू केल्यास शहरातील लहान थोरांसह तरुणांना स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्राची माहिती होण्यास मदत होईल, याला लवकरात लवकर सुरू करावे, अशी सूचना दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांना केली.