नागपूर विद्यापीठ : विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णयाची शक्यतानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेला गुरुवारी हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित परीक्षा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमांच्या विरुद्ध असल्याचा आक्षेप परीक्षा नियंत्रकांनी घेतला होता. परंतु राज्य सरकारने दिलेले निर्देश व उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका यामुळे ही परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाची तयारी असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.प्रवेशबंदी असताना ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे २३ जून रोजी आयोजन करण्यात आले होते. परंतु विशेष परीक्षेचे आयोजन केल्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे कशाप्रकारे उल्लंघन होऊ शकते, अशी भूमिका घेऊन काही सदस्यांनी परीक्षेला आक्षेप घेतला. परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी नियमांनुसार विशेष परीक्षेची तरतूदच नसल्याचे स्पष्ट करीत याला विरोध केला होता. त्यानंतर विद्वत परिषदेची बैठक गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली होती. प्रवेशबंदीच्या यादीमधल्या ६३ महाविद्यालयांतील ६६१६ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गुरुवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत पुनर्विचार करण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी मंगळवारी दिले होते. याप्रकरणावर १ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता पुढील सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्वत परिषदेच्या बैठकीत सर्वसंमतीने पारित निर्णय न्यायालयात सादर करायचा आहे. संस्थाचालकांचा दबावदरम्यान, विद्यापीठाने विशेष परीक्षा घ्यावी याकरिता संस्थाचालकांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे संस्थाचालक विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना भेटून वारंवार यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करीत आहेत. त्यांनी गुरुवारी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले. ही भेट होऊ शकली की नाही याची माहिती उपलब्ध झाली नाही. (प्रतिनिधी)
विशेष परीक्षेला मिळणार ‘ग्रीन सिग्नल’?
By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST