लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माझी वसुंधरा" या अभियानातंर्गत वायुप्रदुषण काही प्रमाणात कमी होण्याचे दृष्टीने शुक्रवारी १ जानेवारी २०२१ ला मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयामध्ये येतील व मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळ मजल्यावर मुख्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी ‘हरित शपथ’ ग्रहण करतील. तसेच सर्व झोन कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी सायकलने कार्यालयात पोहोचतील आणि ‘हरित शपथ’ ग्रहण करतील, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांव्दारे जनमानसात बिंबवणे हा यामागील हेतू आहे.
निसर्गाच्या या पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करुन शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी "माझी वसुंधरा" हे अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र परिपत्रकानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी माझी वसुंधरा अभियान संदर्भात निर्देश दिले आहेत.
"