सावनेर/हिंगणा/काटोल/कळमेश्वर/कुही/नरखेड/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. गुरुवारी ३७३ रुग्णांची नोंद झाली. इकडे बाधितांची संख्या वाढल्याने नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची धास्ती आता ग्रामस्थांनी घेतली आहे.
वर्दळीच्या हिंगणा तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. गुरुवारी येथे आणखी ३४ रुग्णांची भर पडली. यात वानाडोंगरी येथे २१, मोंढा व टाकळघाट येथे प्रत्येकी ३, डिगडोह व अडेगाव येथे प्रत्येकी २ तर रायपूर, इसासनी, नवीव गुमगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४५११ इतकी झाले आहे. यातील ४०१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नरखेड तालुक्यात २४ रुग्णांची नोंद झाली. यातील ८ रुग्ण शहरातील तर १६ ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६९, तर शहरात ६४ इतकी झाली आहे. गुरुवारी जलालखेडा आणि सावरगाव येथे प्रत्येकी ४, मोवाड (६) तर मेंढला येथे दोन रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात ५ रुग्णांची नोंद झाली आहे. यात रामटेक शहरात गांधी व राजाजी वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये मनसर येथे दोन तर सालई येथे एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ११८५ इतकी झाली आहे. यातील १०१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुही तालुक्यात ९ रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर ग्रामीणमध्ये धोका वाढला
कळमेश्वर तालुक्यात आणखी २२ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात ७, तर ग्रामीण भागात १५ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागात तेलकामठी, तेलगाव येथे प्रत्येकी ४, आष्टी कला (३) तर झिल्पी, तिष्टी (बु), दाढेरा, कंळबी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोलमध्ये आणखी ३२ रुग्ण
काटोल तालुक्यात कोरोना साखळी अधिक घट्ट झाली आहे. येथे गुरुवारी ३१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १७, तर ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. शहरात शारदा चौक, होळी मैदान येथे प्रत्येकी तीन, पंचवटी, श्रीराम नगर येथे प्रत्येकी दोन तर सरस्वतीनगर, सावरगाव रोड, दोडकीपुरा, रामदेवबाबा ले-आऊट, नबीरा ले-आऊट, आय.डी.पी, रेल्वे स्टेशन परिसरात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात वाई येथे सहा रुग्ण तर वंडली (वाघ), कारला, वाढोणा, भिष्णूर, हरणखुरी, ढिवरवाडी, शिरसावाडी, कोंढाळी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.