लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘अहो, कसली लस अन् कसले काय? सकाळी आठ वाजता केंद्रावर आलो बघा. आता दीड वाजलेत. पण, अजून नंबर आलेला नाही. कधी येणार हे माहीत नाही. लवकर परत जाता येईल म्हणून सोबत बिस्कीटचा पुडा आणला होता. तो संपला, बाहेरून नाष्टा करून आलो, पण अजूनही नंबर आलेला नाही..,’ एका आजोबांची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे इंदिरा गांधी रुग्णालयातील कोरोना लसीकरणाच्या केंद्रावरची!
ढिसाळ नियोजन, कसलीही व्यवस्था नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा आणि केंद्रावरील कर्मचाऱ्यांची गर्दी पाहून उडालेली तारांबळ अशी काहीशी विदारक अवस्था बुधवारी दुपारी या केंद्रावर दिसली. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत’ चमूने या केंद्राला भेट दिली तेव्हा रुग्णालयाच्या अरुंद मैदानावर पांढऱ्या रंगाने गोल आखण्याचे आणि पंडाल उभारण्याचे काम नुकतेच सुरू झालेले दिसले. आतील हॉलमध्ये आणि बाहेरदेखील प्रचंड गर्दी. जवळपास दोनशे ते सव्वादोनशेच्या वर ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी आणि नाव नोंदणीसाठी धडपडत होते.
या केंद्रावर ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार असल्याचे कळल्याने सकाळपासूनच तोबा गर्दी उसळली होती. त्यामुळे आलेल्या सर्वांनाच टोकन देण्यात आले. सर्वांच्या टोकनवर वेळ मात्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी होती. नियोजनच नसल्याने गर्दी आवरता आवत नव्हती. त्यामुळे सकाळी आठ वाजता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची प्रतीक्षा दुपार उलटून गेली तरी कायमच होती.
लसीकरणासाठी नागरिकांनी सकाळी ७ वाजतापासूनच रांगा लावल्या होत्या. ती रांग थेट रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली होती. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांची या गर्दीत पुन्हा भर पडली. बाहेर वाहनांच्या रांगा लागल्याने सकाळपासूनच या केंद्राला यात्रेचे रूप आले होते.
...
मेरा नंबर कब आयेगा ?
रांगा सकाळी ७ वाजता लागल्या असल्या तरी सकाळी ९ वाजता लॉग इन आयडी मिळाल्यावर प्रत्यक्षात लसीकरणाचे काम सुरू झाले. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत १४४ जणांचे लसीकरण झाले असले तरी जवळपास तेवढेच ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्ण आपला नंबर कधी लागणार याच्या प्रतीक्षेत होते. जसजसा वेळ लागत होता, तसतसा संयमाचा बांध फुटल्याने त्यांचे नातेवाईक आणि केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या शाब्दिक चकमकीही झडताना दिसल्या.
...