लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : अवकाळी पावसाने माैदा तालुक्यातील बोरगाव, सिंगोरी, चिरव्हा, मारोडी, कुराड, नवेगाव या परिसराला चांगलेच झाेडपले. सतत दाेन तास काेसळलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या हरभऱ्याचे पीक मातीमाेल झाले असून, गहू व मिरचीसह भाजीपाल्याच्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिके खराब झाल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या काेलमडले आहेत. त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच चिंतामण रेवतकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
माैदा तालुक्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. यावर्षी कापणीच्या वेळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी गंजी लावल्यानंतर धानाला अंकूर फुटले हाेते. त्याआधी धानावर माेठ्या प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने धानाच्या उत्पादनात घट आली हाेती. शिवाय, फवारणीचा खर्च वाढल्याने धानाचा उत्पादनखर्च वाढला हाेता. या संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हरभरा, गहू व मिरचीच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले हाेते.
हरभऱ्याचे पीक कापणीला तसेच गव्हाचे पीक पक्व हाेत असतानाच अवकाळी पावसामुळे या दाेन्ही पिकांसह मिरची, वांगी, टाेमॅटाे व इतर भाजीपाल्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताताेंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने तसेच शेतकरी त्यांचा संपूर्ण खर्च शेतमालाच्या विक्रीतून करीत असल्याने शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच चिंतामन मदनकर, बाेरगावचे माजी सरपंच सूर्यकांत ढाेबळे यांच्यासह इतर गावांमधील सरपंच व नागरिकांनी केली आहे.
...
पीकविम्याच्या परताव्याची प्रतीक्षा
तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या खरीप व रबी पिकांचा विमा उतरविला आहे. त्यासाठी त्यांनी विमा कंपनीला हप्त्याची रक्कमही अदा केली आहे. खरीप हंगामात धानाच्या पिकाचे तुडतुडे व अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान हाेऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना परतावा (नुकसान भरपाई)पाेटी एक रुपयाही दिला नाही. आता अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांपनी पाहणी करून परतावा द्यावा, अशी मागणीही पीकविमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे.
...
नुकसान भरपाईची मागणी
अवकाळी पावसामुळे हरभऱ्यासह रबी तसेच भाजीपाल्याच्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, शासनाने नुकसान भरपाई जाहीर करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शालिनी देशमुख यांनी केली आहे. यावर्षी उत्पादनखर्च वाढल्याने धानाच्या पिकात शेतकऱ्यांना आर्थक नुकसान सहन करावे लागले. त्यामुहे त्यांची सर्व भिस्त रबी व भाजीपाल्याच्या पिकांवर हाेती. पावसामुळे ती पिकेही संपल्यागत झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी पदाधिकारी राजेंद्र लांडे यांनी केली आहे.