वीरखंडी येथील प्रकार : वीज कंपनीने ठोकला दंडकुही : तालुक्यातील वीरखंडी येथील वॉर्ड क्रमांक १ व ३ मधील विहिरीमध्ये ग्रामपंचायतने विद्युत मोटारपंप बसविले. परंतु या पंपासाठी गेल्या तीन वर्षांपासून चोरीची वीज वापरली जात आहे. हा सर्व प्रकार ग्रामपंचायत सचिवाला माहीत असतानाही चोरीच्या विद्युत पुरवठ्यावर पंप सुरू होते. दरम्यान, वीज कंपनीच्या भरारी पथकाने ही विद्युत चोरी पकडून ग्रामपंचायतला दंड ठोठावला आहे. वीरखंडी ग्रामपंचायत मधील वॉर्ड क्रमांक १ व ३ मध्ये नळांना पाणीपुरवठा योग्य होत नसल्याने ग्रामपंचायतने तेथे विहिरीवर बोअर करून मोटारपंप बसविला. या मोटारपंपासाठी ग्रामपंचायतने नियमानुसार विद्युत कनेक्शन घ्यायला पाहिजे होते. परंतु चक्क विजेची चोरी करून सदर मोटारपंपाचा वापर सुरू केला. थेट मुख्य वीज तारावरुन विद्युत घेऊन मोटारपंप सुरू होते.या सर्व बाबी माजी उपसरपंच परमानंद लोखंडे यांनी खंडविकास अधिकारी, कुही यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहेत. ग्रामसेवकाने या घटनेची माहिती ग्रामपंचायत कमिटीला दिली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकारास ग्रामसचिव जबाबदार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
ग्रा.पं. पंपासाठी विजेची चोरी
By admin | Updated: October 24, 2016 02:57 IST