नागपूर : सध्या देशात शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे कटकारस्थान केंद्र सरकार करीत आहे. संविधानाला अभिप्रेत समाजवाद आणि जनतेचे सार्वभौमत्व या मूलभूत तत्त्वाचा मुडदा पाडणारे आहे, अशी टीका समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांनी केली. आघाडीतर्फे संविधान चौकात संविधान सन्मान रॅलीचे आयाेजन करण्यात आले. यावेळी बाेलताना ते म्हणाले, संविधान विरोधी कारवायांना थांबविण्यासाठी सामाजिक आंदोलनात सहभागी व्हावे. आपण लवकरच राष्ट्रीय पातळीवर सामाजिक आंदोलन पेटविणार आहो, अशी घोषणा प्रा. खैरे यांनी केली. गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेले शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षणाचे धोरण बंद करण्याचे कटकारस्थान सरकार आखत आहे. ७ फेब्रुवारी २०२० रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आरक्षणाचा अधिकार संपुष्टात आला असून, आरक्षण देणे न देणे सरकारच्या मर्जीवर राहणार आहे. म्हणजे आरक्षणाला सुरुंग लागला असल्याची टीका त्यांनी केली.
प्रास्ताविक प्रदीप फुलझेले यांनी तर संचालन सुनील जांभुळकर यांनी केले. करुणा दाभणे यांनी आभार मानले. आयोजनात एल. पी. रामटेके, केशव सोमकुवर, अशोक मेश्राम, भीमराव नंदेश्वर, दादाराम गेडाम, चंद्रभागा पानतावणे, संगीता खोब्रागडे, माधवी फुलझेले, चंद्रशेखर उके, लालचंद लव्हात्रे, तुकाराम सोनारे, दादाराव तागडे, माणिकराव सूर्यवंशी, सुगत रामटेके, नामदेव फर्किडे, सारथीकुमार सोनटक्के, भाऊराव सुखदेवे आदींचा सहभाग हाेता.