नागपूर : अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे. याला सरकारचेच धोरण जबाबदार असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी २१ व २२ एप्रिलला देशव्यापी संप पुकारला होता. यात फोरम आॅफ बीएसएनएल युनियन व असोसिएशन यांच्या आवाहनानुसार नागपुरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सिव्हिल लाईन येथील कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी बीएसएनएल बचाओ, अशी जोरदार नारेबाजी करीत निदर्शने केली. सरकारने सेवा विस्तारासाठी आर्थिक मदत द्यावी, सहायक टॉवर कंपनीला सहभागी करून घेऊ नये, ६,७०० कोटींचे स्पेक्ट्रम शुल्क रिफंड करावे, ४ जी सेवा सुरू करावी. तसेच मालमत्ता परत करणे, स्पेक्ट्रम उदारीकरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.आंदोलनात एनएफटीचे प्रशांत लांडगे, एसएनईएचे टी.बी. वानखेडे, प्रशांत गडकरी, अश्विन शिंदे, प्रवीण कांबळे, जेसीटीयूचे महासचिव गुरुप्रीत सिंग, पी.के. दास, बीएमएसचे संभाजी देशमुख, बीएसएनएलयूचे प्रशांत अंबादे व फोरम आॅफ बीएसएनएल युनियन, असोसिएशनचे समन्वयक पंचम गायकवाड आदींनी सक्रिय पुढाकार घेतला होता. संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर टीका केली. (प्रतिनिधी)
बीएसएनएलच्या तोट्याला सरकारच जबाबदार
By admin | Updated: April 26, 2015 02:25 IST