लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज बिल मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा राज्य शासनावर टीकास्त्र सोडले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी थकबाकीदारांची वीज कापणार नाही, असे सरकारने आश्वासन दिले व शेवटच्या दिवशी नेमके उलटे वक्तव्य करण्यात आले. सरकारला केवळ अधिवेशन काढायचे होते. त्यामुळेच वीज मुद्द्यावर लबाडी केली असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर गुरुवारी त्यांचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अधिवेशनातून महाराष्ट्राला बऱ्याच अपेक्षा होत्या; मात्र प्रत्यक्षात अधिवेशनातून काहीच मिळाले नाही. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची तर मोठी निराशा झाली. विरोधकांनी केवळ सेन्सेशनल मुद्दे उचलले, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे; मात्र आम्ही कोरोना, वीज, शेती यांसारखे सर्वसामान्यांशी जुळलेले मुद्दे मांडले. शिवसेनेला हे जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. केवळ टोचणाऱ्या व बोचणाऱ्या मुद्द्यांचा घाव त्यांच्या वर्मी बसला, असे फडणवीस म्हणाले.
कोरोनाकडे सरकारचे लक्ष नाही
राज्यात कोरोना वाढतो आहे; मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. कोरोना नियंत्रणाची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. अधिवेशन आले की कोरोना वाढतो. मग अधिवेशनादरम्यान तो कमी असतो आणि संपल्यानंतर तो पुन्हा वाढतो. सरकारला अधिवेशन टाळण्यासाठीच कोरोना दिसतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.