पुरेसा साठा नसल्याने रविवारी मोफत लसीकरण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाकडून महापालिकेला लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे रविवारी पुन्हा शासकीय व मनपाच्या केन्द्रावर लसीकरण होणार नाही, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ वर्षावरील लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून एक -दोन दिवसाच्या अंतराने शासकीय केंद्रावर लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. परंतु दिलासादायक म्हणजे, शहरातील खासगी १५ केंद्रावर सशुल्क लस उपलब्ध आहे. ज्यांना लस घ्यावयाची आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे.
नागपूर शहरातील १४५ शासकीय केंद्रावर नि:शुल्क कोविशिल्ड व तीन केंद्रावर कोव्हॅक्सिन दिली जात आहे. तर शहरातील खासगी रुग्णालयातील १३ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यातील ६ केंद्रावर कोविशिल्ड व २ केंद्रावर कोव्हॅक्सिन तर ५ केंदावर स्पुतनिक बी उपलब्ध आहे.
नागपूर शहरात १७ जुलै पर्यत ११ लाख १५ हजार ८१८ लाभार्थींना लस देण्यात आली. यात शासकीय व मनपा केंद्रावर १० लाख ३४ हजार ५३२ लोकांना डोस देण्यात आले. खासगी केंद्रावर ८१०८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर ८८६८९ लाभार्थींना कोव्हॅक्सिन देण्यात आली. जवळपास ८ लाख नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. मागणीनुसार साठा उपलब्ध झाल्यास शंभरटक्के लसीकरण होण्याला फारसा वेळ लागणार नाही. परंतु मर्यादित पुरवठा होत असल्याने लसीकरणावर मर्यादा आली आहे.
शहरातील लसीकरण
पहिला डोस ८०२७०४
दुसरा डोस ३१२९१४
एकूण १११५६१८