सावनेर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना सावनेर तालुक्यात काँग्रेस आणि भाजपाने शक्तिप्रदर्शन करीत या नियमांना हरताळ फासला.
सावनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन, तर पंचायत समितीच्या तीन गणासाठी पोटनिवडणूक होत आहे. दुपारी तहसील कार्यालाय परिसरात दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उमेदवारांचे समर्थन करण्यासाठी गर्दी उसळली होती. तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी उमेदवार मैदानात उतरविले आहेत.
केळवद जि. प. सर्कलचे माजी सदस्य तथा नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या पत्नी सुमित्रा मनोहर कुंभारे यांना काँग्रेसने संधी दिली आहे. वाकोडी सर्कलमध्ये ज्योती शिरस्कर यांना पुन्हा संधी देण्यात आली. भाजपकडून केवळवदमध्ये संगीता मुलमुले, तर वाकोडी येथून आयुषी धपके यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने बडेगाव पंचायत समिती गणात गत निवडणुकीतील पराभूत उमेदवार जयश्री सुधीर चौधरी यांनाही मैदानात उतरविले आहे. गत निवडणुकीत त्या अल्पमतांनी पराभूत झाल्या होत्या. सोमवारी दुपारी या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. तालुक्यात जि.प.च्या दोन सर्कलसाठी ५, तर पंचायत समितीच्या ३ गणासाठी १४ अशा १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
तालुक्यातील जि.प. व पं.स पोटनिवडणुकीसाठी सर्कलनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार असे : केळवद जि. प सर्कल- सुमित्रा मनोहर कुंभारे (काँग्रेस), संगीता विनोद मुलमुले (भाजप), वाकोडी जि. प. सर्कल- ज्योती अनिल शिरसकर (काँग्रेस), आयुषी जितेश धपके (भाजप), वैशाली विजय हिवराळे (अपक्ष) यांचा समावेश आहे. बडेगाव पं. स. गणात भावना अरुण चिखले (काँग्रेस), जयश्री सुधीर चौधरी (भाजप), सेवंती राजेंद्र आतराम (अपक्ष), रेखा भगवान भुजाडे (शिवसेना), सुजाता देवेंद्र बांगडे (वंचित बहुजन आघाडी) यांनी अर्ज दाखल केले.
वाघोडा पं. स. गणात ममता प्रशांत केसरे (काँग्रेस), भारती मनोज आटणकर (भाजप), वैशाली विजय हिवराळे (अपक्ष), जिजाबाई संतोष खुले (शिवसेना), तर नांदागोमुख पं. स. गणात गोविंदा बारकुजी ठाकरे (काँग्रेस), माणिकराव काशीनाथ बल्की (भाजप), दिनेश गणपत माडोकर, प्रेमदास वासुदेव भसमे (अपक्ष), धनराज भाऊराव मोवाडे (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप
जि.प व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवळी तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन झाले. अनेकांनी मास्क वापरला नव्हता, तर फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजविले. याबाबत उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना विचारणा केली असता तहसीलदारांना चौकशीची सूचना करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---