लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने शहरात १२ फिरते कोरोना चाचणी केंद्र सुरू केले. गेल्या गुरुवारी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. चार दिवसात हजाराहून अधिक नागरिकांनी या केंद्रात चाचणी करून घेतली. फिरत्या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज ३०० ते ४०० नागरिकांची चाचणी केली जात आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.मनपाने करोना चाचणीसाठी शहरात ५० केंद्र सुरू केले. मात्र या केंद्रांवर नागरिक येण्यास टाळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी फिरते कोरोना चाचणी केंद्र सुरू केले. दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक फिरते मोबाईल केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचणीची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.फिरत्या चाचणी केंद्राच्या माध्यमातून शिबिरे घेतली जात आहे. नागरिक स्वत: हून चाचणीसाठी पुढे येत आहेत. पहिल्या दिवशी गुरुवारी १७० नागरिकांनी चाचणी केली. शुक्रवारी ३५३ तर शनिवारी ४०० नागरिकांची चाचणी करण्यात आली.डॉक्टरसह नर्सची व्यवस्था'आपली बस'ला यासाठी विशिष्ट स्वरूपात तयार करण्यात आले आहे. यात दोन डॉक्टर्स, नर्स व आरोग्य सहायक आहेत. शिवाय, नगरसेवकांनी मागणी केल्यास त्यांच्या प्रभागातही शिबिराच्या माध्यमातून चाचणी करण्याची सोय करण्यात आली आहे.संसर्ग टाळण्यासाठी चाचणी करामहापालिका प्रशासनाने अधिकाधिक चाचणी करून कोरोना संक्रमणावर नियंत्रणाचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याअंतर्गत फिरते चाचणी केंद्र सुरू केले आहेत. चार दिवसात हजाराहून अधिक नागरिकांनी चाचणी केली. नागरिक झोन कार्यालयाशी संपर्क साधतात. त्यांच्या सोयीनुसार बगिचा, हॉलमध्ये व्यवस्था केली जाते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले व चाचणीची गरज असलेल्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व संसर्ग टाळावा.राम जोशी, अतिरिक्त आयुक्त मनपा