नागपूर : पोलिसांच्या हाती लागलेल्या गोल्डन गँगचा सूत्रधार हा सीताबर्डी येथील राजू तस्कर असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात स्वत: निवृत्त पोलीस अधिकारी अडक ल्याने पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुप्त एजन्सीच्या सूचनेवरून गत शुक्रवारी गुन्हे शाखा पोलिसांनी सेवानिवृत्त डीवायएसपी प्रदीप बोबडेना सोन्याची तस्करी करताना रंगेहात पकडले. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ३१ लाख रुपये किमतीचे १ किलो १३२ ग्रॅम सोने जप्त केले. ते सोने कडबी चौकातील वीरेंद्र लालवाणी याने दुबई येथून आणले होते. यानंतर त्याने ते सर्व सोने विमानतळावरच ठेवले होते. गोल्डन गँगमध्ये सहभागी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी संधी साधून शुक्रवारी सकाळी ते सोने बोबडे यांच्या स्वाधीन केले. येथून बोबडे ते सोने राजू तस्कर याच्याकडे पोहोचविणार होता. परंतु त्यापूर्वी बोबडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. माहिती सूत्रानुसार राजू तस्करीचे सीताबर्डी येथे दुकान आहे. तो सोन्यासह विदेशी कंपनीच्या सिगारेट विक्रीसाठी कुख्यात आहे. वीरेंद्र हा त्याचाच कर्मचारी आहे. त्यामुळे वीरेंद्र हा सोन्याच्या खरेदीसाठी नेहमी दुबई येथे जात होता. याशिवाय राजूने इतरही काहीजण या कामासाठी ठेवले आहेत. ते दुबईवरून आणलेले सोने विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या हाती देत होते. यानंतर विमानतळावरील कर्मचारी संधी साधून ते सोने विमानतळाबाहेर काढत होते. गत शुक्रवारी विमानतळावरून ते सोने बाहेर काढताच बोबडे यांच्या हाती देण्यात आले. दुबई येथे सोन्यावर शुल्क लागत नसल्याने भारतात एक किलो सोन्यावर तीन ते चार लाख रुपयांची बचत होते. माहिती सूत्रानुसार राजू हा गत अनेक दिवसांपासून सोन्याची तस्करी करीत आहे. यासाठी त्याने कस्टम विभागातही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच त्याची टोळी विमानतळावरून सहज सोने बाहेर काढण्यात यशस्वी होत होती. (प्रतिनिधी)१९ वेळा प्रयत्न फसलेराजू तस्करच्या टोळीला पकडण्यासाठी तब्बल १९ वेळा प्रयत्न करण्यात आले. पण सर्व प्रयत्न फसले. परंतु शुक्रवारी गुप्त एजन्सीला अचूक माहिती मिळाली होती. त्यामुळेच बोबडेला अटक करण्यात यश मिळाले आहे. माहिती सूत्रानुसार राजूचा व्यवसाय शेजारच्या राज्यातही पसरला असल्याची माहिती आहे.
सोने तस्करीचा सूत्रधार ‘राजू तस्कर’
By admin | Updated: July 7, 2014 00:59 IST