नागपूर : देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने आठवड्यात संकटात सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोने आणि चांदीची चमक फिकी पडली. ११ ते १६ जानेवारीदरम्यान नागपुरात २४ कॅरेट सोन्याच्या भावात ३५० रुपयांनी घसरण होऊन भाव ५०,७५० रुपये आणि चांदीचे किलो दर ६६,५०० रुपयांवर स्थिरावले.
सराफा व्यापारी म्हणाले, आठवड्यात जागतिक कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये फारशी घसरण वा वाढ झाली नाही. भारतासह काही देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक कमी केली. याशिवाय लग्नकार्यही नसल्याने लोकांनी सध्या खरेदी थांबविली आहे.
शनिवार, ९ जानेवारीला सोने ५१,१०० रुपये चांदी किलाेचे भाव ६६,५०० रुपये होते. सोमवार, ११ रोजी बाजारात अखेरच्या सत्रात सोन्यात केवळ ५० रुपये आणि चांदीच्या किमतीवर दबाव येऊन ५०० रुपयांची घसरण होऊन भाव अनुक्रमे ५१,०५० आणि ६६ हजारांवर स्थिरावले. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे सोने २५० रुपये तर चांदी एक हजार रुपयांनी वाढली. बुधवारी सोन्यात १५० रुपयांची घसरण झाली तर चांदी ६७ हजारांवर स्थिर होती. गुरुवार, १४ रोजी खरेदीअभावी दोन्ही मौल्यवान धातूच्या भावात घसरण पाहायला मिळाली. या दिवशी शुद्ध दहा ग्रॅम सोन्याचे भाव ३५० रुपयांनी कमी होऊन ५०,८०० रुपये आणि चांदी एक हजारांनी स्वस्त होऊन ६६ हजारांवर पोहोचली. शुक्रवारी सोन्यात २०० रुपये आणि चांदीत ५०० रुपयांची वाढ झाली. याशिवाय शनिवार, १६ रोजी सोन्यात २५० रुपयांची घसरण होऊन भाव ५०,७५० तर चांदीचे भाव ६६,५०० रुपयांवर स्थिर होते.
महागाईच्या काळात सोने हेच प्रभावी ठरू शकते, असे मानले जाते. देशात करोना लसीकरण मोहीम सुरू झाल्याने अर्थव्यवस्थेतील कोरोना संकटाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात सोने-चांदीची चमक कमी होणार नाही, असे सराफांनी सांगितले.