लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बकऱ्यांची चाेरी करणाऱ्या दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून छाेटे मालवाहू वाहन आणि बकऱ्या असा एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जलालखेडा (ता. नरखेड) परिसरात गस्तीवर असताना त्यांना या भागातून बकऱ्यांची चाेरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी जलालखेडा परिसरात नाकाबंदी करून नागपूरच्या दिशेने जात असलेले एमएच-३५/के-०५६० क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली.
त्या वाहनात बकऱ्या काेंबल्या असल्याचे निदर्शनास येताच पाेलिसांनी कसून चाैकशी केली. त्यात वाहनातील बकऱ्या चाेरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या पथकाने वाहनातील साैरभ ऊर्फ बंटी मनाेज नंदेश्वर (२३, रा. वैशालीनगर, नागपूर) व अशफाक अन्सारी वल्द अनिस अन्सारी (२१, रा. टेका, नागपूर) या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे वाहन आणि १४ हजार रुपये किमतीच्या बकऱ्या जप्त केल्या, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे व राजी कर्मलवार, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे व जावेद शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.