मेयो, मेडिकल : वैद्यकीय सचिवांच्या सूचनानंतर अधिष्ठात्यांचे पत्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये रात्री योग्य उपचार मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. परंतु आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. कारण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना रात्री ८ ते सकाळी ८ या बारा तासांच्या कालावधीतील रुग्णसेवेचा रोजचा अहवालच मागितला आहे. त्यांच्या सूचनानुसार नागपुरातील मेयो, मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी आपल्या सर्व विभाग प्रमुखांना पत्र देऊन रोजचा हा अहवाल अभिलेखागार विभागात सादर करण्याचे पत्र दिले आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नोंदणी होणाऱ्या रुग्णांची माहिती, उपलब्ध औषधे, यंत्रसामुग्री आदींची माहिती राज्यातील सोळाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) पाठवावी लागते. परंतु गेल्या साठ वर्षात केवळ रात्रकालीन माहिती कोणीच मागितली नव्हती. नुकत्याच झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाच्या काळात ही माहिती उपलब्ध करून दिली जात होती. परंतु आता या विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीतील रुग्णसेवेची माहिती मागितली आहे. यात अपघात विभागात किती रुग्ण उपचारासाठी आलेत, त्यांच्यावर झालेले उपचार, उपचारादरम्यान झालेला मृत्यू, उपस्थित डॉक्टर आदींची संपूर्ण रोजची माहिती मागितली आहे. विशेष म्हणजे, सकाळच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचाराला घेऊन तारांबळ उडालेली असते. रात्री अनेक वरिष्ठ डॉक्टर हजर राहत नाही. यामुळे संपूर्ण जबाबदारी निवासी डॉक्टरांवर येते. त्यांचा अनुभव कमी असल्याने गंभीर रुग्णांवर उपचाराची दिशा ठरविताना अनेकवेळा अडचणीचे जाते. यातूनच वाद निर्माण होतात. यावर हा अहवाल उपाययोजनांचे काम करेल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. सचिवांच्या सूचनावरून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी तत्काळ सर्व विभागांना या संदर्भाचे पत्र पाठवून रोजचा अहवाल रुग्णालयाच्या अभिलेखागार विभागात सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. मेयोतही असेच पत्र विभागप्रमुखांना मिळाल्याची माहिती आहे. रुग्णालयाचा रोजचा रात्रीचा आढावा पाठविण्यात येणार असल्याने राज्यासह नागपूरच्या या दोन रुग्णालयांमध्ये काय बदल होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोज द्या रुग्णसेवेचा अहवाल
By admin | Updated: June 24, 2017 02:34 IST