जयंत पाटील यांचा सल्ला : शहर कार्यकारिणीची बैठकनागपूर : ‘एनर्जी द्या’ म्हणत नेत्यांच्या मागे लागू नका. तुमच्यात खूप क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर करा. महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. त्यासाठी प्रभाग स्तरावर पक्षाची शिबिरे घ्या. कार्यकर्ता मेळावे घ्या. तसेच निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार रिंगणात उतरवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात झाली. तीत शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आ. दीनानाथ पडोळे, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, गंगाप्रसाद ग्वालबंसी, शब्बीर विद्रोेही, वेदप्रकाश आर्य, नगरसेवक दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार, दिलीप पनकुले यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष, प्रवक्ते उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले,नागपुरात पक्ष पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. वातावरण चांगले दिसत आहे. भाजपचा ग्राफ जेवढ्या झपाट्याने वाढला तेवढ्याच झपाट्याने खाली आला आहे. भाजपचे अपयश ताकदीने जनतेसमोर मांडा, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही १५ वर्षे सत्तेत होते. पण त्या काळात संघटना व कार्यकर्त्यांकडे दिले नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. यावेळी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची मते ऐकून घेतली. अनिल देशमुखांना पक्षाने आजवर महत्त्वाचे मंत्रिपद दिले नाही. विदर्भात पक्षाची उपेक्षाच झाली आहे. विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे २६ आमदार आहेत. त्या आमदारांचा विकास निधी विदर्भ व नागपुरातील विकास कामांसाठी स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी केली. पाटील यांनी ही सूचना मान्य केली. (प्रतिनिधी)
जिंकण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी द्या
By admin | Updated: August 29, 2016 02:56 IST