नागपूर : आजारपण व बेरोजगारीने त्रस्त एका युवकाने आपल्या मुलीच्या पाळण्याच्या दोरीनेच गळफास लावून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना वाठोडा पोलीस ठाणे परिसरात घडली. त्याचप्रकारे मेट्रोच्या एका अभियंत्यानेसुद्धा गळफास लावून आत्महत्या केली. ३६ वर्षीय सचिन मुकुंदराव झंझाड हा गॅरेजमध्ये काम करीत होता. लॉकडाऊनच्या काळात तो बेरोजगार झाला. तो घरीच राहत होता. पत्नी बॅग शिलाई करून घर चालवित होती. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी सचिनला लकवा मारला. तेव्हापासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. तो पत्नीशी वादही घालायचा. पत्नी त्याला शांत राहण्यास सांगायची. मंगळवारी दुपारी पत्नी रूपाली गॅलरीमध्ये भांडे घासत होती. तिने मुलीला पाळण्यात ठेवून सचिनला झोका देण्यास सांगितलेे हाेते. मुलगी झोपल्यानंतर सचिनने तिला पाळण्यातून काढून बेडवर ठेवले. त्यानंतर त्याच पाळण्याच्या दोरीने गळफास लावून घेतला. रूपाली खोलीत आल्यावर तिला पती फासावर लटकलेला दिसला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सचिनचा जीव गेला होता.
त्याचप्रकारे यवतमाळ येथील २७ वर्षीय पराग दिलीप ढोमणे हा प्रजापती नगरात राहत होता. असे सांगितले जाते की, पराग हा मेट्रोमध्ये अभियंता होता. त्याने घरीच गळफास लावून घेतला. वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.