हायकोर्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकरणनागपूर : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. हे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.कुंदन नानाजी पेंदोर (२५) असे आरोपीचे नाव असून तो बोडखा, ता. वरोरा येथील रहिवासी आहे. आरोपी व्यवसायाने वाहन चालक होता. त्याची पीडित मुलीच्या वडिलासोबत मैत्री होती. यामुळे त्याचे मुलीच्या घरी जाणे-येणे होते. दरम्यान, त्याने पीडित मुलीसोबत मैत्री केली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निश्चय केला. यातून आरोपीने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. परिणामी मुलगी गर्भवती राहिली. यानंतर आरोपीने पीडित मुलीसोबत लग्न करण्यास नकार देऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. यामुळे १५ जून २०१३ रोजी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पीडित मुलीने बाळाला जन्म दिला. वैद्यकीय तपासणीतून आरोपी हा बाळाचा पिता असल्याचे सिद्ध झाले.वरोरा येथील विशेष न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी वैद्यकीय अहवाल, मुलीची जन्मतारीख व अन्य विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. वरोरा पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
मुलीवर अत्याचार, जन्मठेप कायम
By admin | Updated: October 24, 2016 02:50 IST