हितकारिणी परिषद : सुखदेव थोरात यांचे आवाहननागपूर : दलित, आदिवासी व मागासवर्गीयांचा अद्याप आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास झालेला नाही. घटनात्मक अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघटना पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. यासाठी विविध संघटनांनी संघटित व्हावे ,असे आवाहन इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्सेस रिसर्च चे अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात यांनी रविवारी साई सभागृहात आयोजित बौद्ध -दलित-आदिवासी व इतर मागासवर्गीय हितकारिणी परिषदेत केले.अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे होते. डॉ.एम.एल.कासारे, प्रा. सुचित बागडे, डॉ. सुनील तलवारे, कृष्णा इंगळे, विद्याधर बनसोड, प्रा. धम्मसंगिनी, भीमराव वाघमारे, डॉ. विजय खरे, अल्का पाटील, विलास भोंगाडे, प्रकाश बनसोड, जे.एस.पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासोबतच आर्थिक समानता निर्माण करण्याची सरकारची जबाबदारी आहे. परंतु आज खासगीकरणाच्या नावाखाली घटनात्मक अधिकार हिरावले जात आहे. खासगी संस्थात आरक्षण, मागासवर्गीना उच्च व तंत्र शिक्षण, रोजगाराच्या संधी, भूमिहीन लोकांना जमीन मिळाली पाहिजे. उपेक्षितांना न्याय मिळावा यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत. परंतु हे प्रयत्न पुरेसे नाही. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याने हितकारिणी परिषदेची स्थापना करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली.सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. कायद्याचे संरक्षण असूनही आज जातीयतेचा प्रश्न कायम आहे. उपेक्षित घटकांना घटनेत देण्यात आलेली आश्वासने पूर्ण झाली का, ती किती झाली, याचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना संविधानाच्या मूल्याची जाणीव नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. अपेक्षितांना घटनात्मक तरतुदीचा लाभ मिळावा,यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ मुद्यांचे निवेदन दिल्याची माहिती इ.झेड.खोब्रागडे यांनी दिली. अनुसूचित जाती-जमातीच्या विकासासाठी लोकसंख्येच्या आधावर निधी खर्च व्हावा, असे मत त्यांनी मांडले.आर्थिक व सामाजिक सर्वे करण्याची गरज असल्याचे एम.एल.कासारे यांनी प्रस्ताविकातून सांगितले. यावेळी सुचित बागडे, सुनील तलवारे, कृष्णा इंगळे, विद्याधर बनसोड, प्रा. धम्मसंगिनी, भीमराव वाघमारे, डॉ. विजय खरे, अल्का पाटील, विलास भोंगाडे, प्रकाश बनसोड आदींनी मार्गदर्शन केले. संचालन प्रा. मोहन वानखेडे यांनी तर आभार प्रा. विद्या चौरपगार यांनी मानले. विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
घटनात्मक अधिकारासाठी संघटित व्हा
By admin | Updated: January 26, 2015 00:56 IST