पोलीस आयुक्तांचे वादग्रस्त वक्तव्य : पोलीस भरतीदरम्यान लावली होती ‘ड्युटी’नागपूर : जनसामान्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुरुषांसोबत महिला पोलीसदेखील खांद्याला खांदा लावून काम करत असतात. परंतु पोलीस अधिकारी मात्र महिलांना दुय्यमच समजत असल्याचे नागपूरात दिसून आले. खुद्द पोलीस आयुक्त एस.पी.यादव यांनी महिला पोलिसांना सामान्य ज्ञान कमी असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. सामान्य ज्ञान कमी असल्यानेच महिला पोलिसांची लेखी परीक्षेदरम्यान ड्यूटी लावण्यात आली होती. या प्रकाराने आम्ही आमच्या रणनीतीत यशस्वी झालो, या त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शहर पोलिस दलातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान पुरुष उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला असता पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांनी अजब खुलासा केला. ते म्हणाले की, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उत्तर देता येत नाही. त्यांचा कॅलिबर किती असतो ? त्यांना सामान्य ज्ञान किती असते ? हे मला माहिती आहे. त्यामुळे पोलीस भरती लेखी परीक्षेत जास्त प्रमाणात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती आणि आमची ती योजना यशस्वी ठरल्याचेही पोलीस आयुक्त यादव म्हणाले. पोलीस भरती प्रक्रियेचा घोळ सुरू असताना आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आयुक्तांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
महिला पोलिसांचे सामान्य ज्ञान कमीच
By admin | Updated: May 19, 2016 02:38 IST