नागपूर : ९ महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे गेट शनिवारी सामान्य नागरिकांसाठी उघडण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचे परवानगी पत्र शनिवारी महाराजबाग व्यवस्थापनाच्या सुपूर्द केले. मात्र १० वर्षाखालील मुले आणि ६५ वर्षावरील ज्येष्ठांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे.
काेराेना विषाणूचा प्रकाेप सुरू झाल्यानंतर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून इतर पर्यटन स्थळांसह महाराजबागही बंद करण्यात आले हाेते. दरम्यान, जून महिन्यापासून सर्वत्र अनलाॅकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. १४ ऑक्टाेबरपासून पर्यटनही सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर दाेन महिने लाेटूनही शहरातील महाराजबाग सुरू करण्यात आले नसल्याने नागिरकांचा हिरमाेड हाेत हाेता. शिवाय प्राणिसंग्रहालय प्रशासनाला पर्यटन बंद असल्याने लाखाेंचे नुकसान हाेत हाेते. कर्मचाऱ्यांचे वेतन करणेही कठीण झाले हाेते. त्यामुळे महाराजबागकडून जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटन सुरू करण्याबाबत दाेन महिन्यापूर्वीच पत्र पाठविले हाेते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी महाराजबाग सुरू करण्याचे आदेश काढले आणि गेट उघडण्यात आले.
प्राणिसंग्रहालयात ३०० वन्यजीव
प्रशासनाच्या माहितीनुसार महाराजबाग प्राणिसंग्रहालयात सध्या दाेन वाघ, ५ बिबट, ३० हरीण, १५ बारसिंगा, १५ नीलगाय, ४ माेर, दाेन मगर, ५ अस्वल व माकडे मिळून ३०० वन्यजीवांचे वास्तव्य आहे. शिवाय लहान मुलांसाठी खेळण्याचे अनेक साहित्य व मत्स्यालयही आहे. नागपूरकरांच्या मनाेरंजनाचा माेठा ठेवा येथे असल्याने दरराेज हजाराे पर्यटक मुलांसह येथे येतात. त्यामुळे दर महिन्याला १२ लाख रुपये कमाई हाेत असल्याची माहिती आहे. ९ महिने बंद असल्याने एक काेटीपर्यंतचे नुकसान सहन करावे लागले आहे.
अटी व शर्ती
- पर्यटन सुरू करताना शारीरिक अंतर व नियमांचे पालन करावे लागेल. त्यामुळे क्षमतेनुसार मर्यादित प्रवेश द्यावा.
- प्रवेशद्वारावर येणाऱ्या पर्यटकांचे थर्मामीटर गनद्वारे तापमान माेजण्यात यावे. ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन स्तर घ्यावा व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल.
- १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील नागरिकांना प्रवेश परवानगी नसेल.
- रात्री पर्यटनाला परवानगी नसेल.