न्यायालय आवारात तणाव : चार जणांना अटकनागपूर : प्रॉपर्टी डीलरकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले गेलेले सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण माळी यांना रविवारी न्यायालय आवारात किन्नर आणि विदर्भवाद्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या तोंडाला काळ्या व निळ्या रंगाची शाई फासली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लोकसभा निवडणुकीतील पराभूत किन्नर उमेदवार उत्तम सपन सेनापतीसह चार जणांना अटक करण्यात आली. माळी आणि त्यांचा रायटर मनोहर निमजे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी विशेष न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. अरुण माळी आणि मनोहर निमजे यांना शनिवारी रात्री प्रॉपर्टी डीलर शकील बाबू यांच्या जवळून अडीच लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली होती. या दोघांना न्यायालयात हजर करून परत नेले जात असताना किन्नरांच्या समूहाने आणि विदर्भवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांंंंनी माळीवर हल्ला चढविला. त्यांनी माळीला मारहाण केली. मारहाणी दरम्यान त्यांच्या चेहर्यावर आणि पाठीवर शाई फेकण्यात आली. याचवेळी माळी सोबत हेड कॉन्स्टेबल संजय ठाकूर आणि इतर कर्मचारी होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सर्वजण घाबरले. एसीबीच्या कर्मचार्यांनी माळी यांना वाचविण्यासाठी गराडा घातला. तत्पूर्वी तृतीयपंथीयांसह ४0 ते ५0 नागरिकांनी माळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे चित्र पाहून न्यायालय सुरक्षेतील पोलीस ताफ्याने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माळी यांची किन्नर आणि विदर्भवाद्यांच्या तावडीतून सोडवणूक केली. पोलिसांनी किन्नर उत्तम सेनापती, सुनील चोखारे, राधिका हेडाऊ, संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर माळी आणि निमजे यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालय परिसरातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी सेनापती आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलिसांनी मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची जमानतीवर सुटका करण्यात आली आहे.विदर्भवाद्यांच्या आंदोलनात माजी आमदार भोला बढेल, अहमद कादर, अरुण बनकर, मोहन बजाज, संजय कुकरेजा, क्लॉडिया पिटर, राहुल थोरात, बैजू पिटर, चार्ल्स फ्रान्सिस, रफ्फूभाई, अशफाक रहमान, कैलास चरडे, हेमराज गभने, आशा पाटील, रोशन हिरणवार, हिराबाई टेंभुर्णे, शेख बिलाऊद्दीन सहभागी झाले होते. दरम्यान किन्नर आणि विदर्भवाद्यांनी आपणावर हल्ला करण्यासाठी अँसिड आणले होते, अशी तक्रार खुद्द माळी यांनी नोंदवली आहे. एका कामगार तरुणीची खरेदी-विक्री करण्याच्या प्रयत्नात माळी यांनी संशयास्पद भूमिका घेतली होती. पीडित तरुणीची मदत तृतीयपंथी उत्तम सेनापतीने केली होती. माळी यांनी सेनापती सोबत असभ्य वर्तन केले होते. माळी यांनी डिसेंबर २0१३ मध्ये विदर्भवादी नेत्यांना अटक करून त्यांच्याशी गैरवर्तणूक केली होती. त्यामुळे आपण काळे फासले, असे किन्नर आणि विदर्भवाद्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. न्यायालयात आरोपी माळी यांच्यावतीने अँड.कुरेशी तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
माळींना फासले काळे
By admin | Updated: June 9, 2014 01:26 IST