लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विदर्भ-मराठवाडा हे दोन्ही प्रदेश जोडण्याच्या प्रक्रियेत वरदान ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलाेमीटरच्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी आपला ११९ काेटी ५१ लक्ष रुपयांचा निधीचा वाटा मंजूर केला असून, रेल्वे विभागाला वितरितही केला असून, यंदाच्या आर्थिक वर्षासाठी रेल्वेने मागणी केल्याबरोबर निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
नांदेड-यवतमाळ-वर्धा हा रेल्वे मार्ग विदर्भ-मराठवाड्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाताे. त्यासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याकडे ‘लाेकमत’ समूहाच्या एडिटाेरिअल बाेर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी १२ डिसेंबर २०२० राेजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले हाेते. या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग ‘फास्ट ट्रॅक’वर टाकावा, अशी मागणीही पत्रात करण्यात आली हाेती.
या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांना कार्यवाहीची सूचना केली होती. त्यानुसार, ॲड. परब यांनी २० सप्टेंबर २०२१ राेजी विजय दर्डा यांनी पाठविलेल्या पत्रात राज्याच्या निधीचा लेखाजाेखा सादर केला आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२० पर्यंत राज्याच्या वाट्याचे ४५५ काेटी ११ लाख रुपये तर २०२०-२०२१ आर्थिक वर्षात आणखी ११९ काेटी ५१ लाख रुपये रेल्वे विभागाला वितरित करण्यात आले आहेत. अशारीतीने आतापर्यंत राज्य शासनाने आपल्या वाट्याचा ५७४ काेटी ६२ लाखांचा निधी मध्य रेल्वेला वितरित केला आहे. सन २०२१-२०२२ या वर्षात रेल्वेने या मार्गासाठी अद्याप निधीची मागणी केलेली नाही. ती हाेताच राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी पुरविला जाईल, अशी ग्वाही ॲड. परब यांनी विजय दर्डा यांना दिली आहे.
--------------
चाैकट....
पावणेतीनशे काेटींचा प्रकल्प १६०० काेटींवर
* फेब्रुवारी २००८ ला नांदेड-यवतमाळ-वर्धा हा रेल्वे मार्ग जाहीर झाला हाेता. ११ फेब्रुवारी २००९ ला तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन पार पडले.
* या प्रकल्पाची मूळ किंमत २७४ काेटी ५५ लाख एवढी हाेती, मात्र सध्या हा प्रकल्प १६०० काेटींवर पाेहाेचला आहे.
* यात केंद्र शासनाचा निधीचा वाटा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के एवढा आहे.
* २८४ किमीच्या या मार्गात एकूण २७ रेल्वे स्टेशन असून, त्यातील तीन जुने आहेत.
* या मार्गाचे भू-संपादन पूर्णत्वाकडे आहे. वर्ध्यापासून यवतमाळपर्यंत मार्गाचे मातीकाम पूर्ण झाले आहे.
* या मार्गासाठी माजी खासदार विजय दर्डा राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
----------------------------------