नागपूर : डीलर्स, मोठे स्टॉकिस्ट आणि वितरकांकडून माल वा वस्तू विकत घेताना लहान वा चिल्लर व्यापाऱ्यांनी भरलेला व्हॅट वा राज्यकर शासकीय तिजोरीत जमा न करणाऱ्यांवर एफआयआर नोंदविण्यात येणार असल्याची माहिती राज्यकर सहआयुक्त डॉ. वै. दि. कामठेवाड यांनी दिली.
नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, महासचिव ज्ञानेश्वर रक्षक आणि सहसचिव अनिल नागपाल यांनी कामठेवाड यांना गुरुवारी यासंदर्भात निवेदन दिले. देशमुख म्हणाले, अनेक डीलर्स, स्टॉकिस्ट आणि वितरक काम सोडून पळाले आहेत. त्यांच्यासह अस्तित्वातील अनेकांनी राज्यकर अर्थात जीएसटी म्हणजेच पूर्वीचा व्हॅट भरला नाही. व्यवसाय करताना त्यांच्याकडे राज्याचा व्हॅट क्रमांक असतो. मालाची विक्री करताना ते चिल्लर व्यापाऱ्यांकडून व्हॅट अथवा जीएसटी वसूल करतात. तो कर राज्य शासनाच्या तिजोरीत भरणे त्यांना बंधनकारक असते. पण त्यांनी कर राज्याच्या तिजोरीत न भरल्याने शासनाने व्हॅट अथवा जीएसटी वसुलीसाठी नागपुरातील हजारो चिल्लर व्यापाऱ्यांना पुन्हा नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिसांची रक्कम कोट्यवधीच्या घरात आहेत. आधीच कर भरला असताना पुन्हा दुसऱ्यांदा कर कसा भरायचा, असा सवाल लहान व्यापाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे चिल्लर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तुटपुंज्या भांडवलावर व्यवसाय करणारे व्यापारी मानसिकदृष्ट्या विकलांग झाले आहेत. या त्रासाने चिल्लर व्यापारी आत्महत्या करतील, त्याचे आश्चर्य वाटायला नको. नोटिसासंदर्भात अधिकारी ऐकायला तयार नाहीत. कर पुन्हा भरावाच लागेल, असे अधिकारी सांगत आहेत. यासंदर्भातील माहिती आणि विस्तृत निवेदन कामठेवाड यांना दिले. चोर सोडून संन्यासाला फाशी नको, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
देशमुख म्हणाले, यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यथा मांडण्याची विनंती कामठेवाड यांच्याकडे केली. यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनाही पत्र पाठविले आहे.
नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून कामठेवाड म्हणाले, यासंदर्भात सत्यस्थिती जाणून घेऊन कर न भरून फसवणूक करणाऱ्यांवर एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहे.