लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील वाॅर्ड क्रमांक-११ मधील शारदा चाैक व परिसर घाण व कचऱ्याचे माहेरघर बनत चालला आहे. या भागात अनुकूल वातावरण मिळत असल्याने डुकरांचा मुक्त संचार वाढत चालला असून, स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक नगरपालिका प्रशासनासाेबतच या वाॅर्डमधील लाेकप्रतिनिधींनी मुद्दाम कानाडाेळा केला आहे, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे.
कामठी ही नागपूर जिल्ह्यातील माेठी नगर परिषद असून, तेवढ्याच माेठ्या व गंभीर समस्यादेखील या शहरात आहेत. शहरातील कचऱ्याची उचल ही मूलभूत बाब असली तरी वाॅर्ड क्रमांक-११ मधील शारदा चाैक परिसर घाण व कचऱ्याने बरबटला आहे. याच कचऱ्यामुळे येथे डुकरांचा मुक्त संचार वाढला आहे. डुक्कर हा कचरा व घाण स्वत:साेबत इतरत्र पसरवितात. त्यामुळे येथील नागरिकांना राेज स्वच्छताविषयक समस्यांना ताेंड द्यावे लागते.
गलिच्छ वातावरणामुळे या भागात डासांची पैदास वाढली असून, लहान मुलांसह नागरिकांना मलेरिया व इतर कीटकजन्य आजार हाेण्याची शक्यताही बळावली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी पालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी व वाॅर्डातील लाेकप्रतिनिधींकडे अनेकदा तक्रार केली. प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष दिले नाही. उलट, येथील एक लाेकप्रतिनिधी या भागातून रनाळा (ता. कामठी) येथे राहायला गेल्या, असेही नागरिकांनी सांगितले.
....
दर महिन्याला ५० लाखांचा खर्च
कामठी शहरातील कचऱ्याची नियमित उचल करून त्याची याेग्य विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासन दर महिन्याला ५० लाख रुपये खर्च करते. कचऱ्याची उचल करण्याचे अमरावती येथील व्यक्तीला पालिकेने कंत्राट दिले आहे. शहरात १६० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या दिमतीला कचरा संकलन गाड्याही दिल्या आहेत. शहरातून गाेळा केलेला कचरा शहराबाहेर साठविण्याची व्यवस्थाही केली आहे. यावर करण्यात येणारा खर्च नागरिकांकडून कराच्या रूपाने वसूलही केला जाताे. मात्र, शहरातील कचरा, घाण व डुकरांची समस्या साेडवायला कुणीही तयार नाही.