लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतीचे विक्रीपत्र करून देण्याच्या नावाखाली कोहळी (कळमेश्वर) येथील एका दाम्पत्याने ६ लाख रुपये हडपले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या करारनाम्याचे आरोपी पालन करत नसल्याने अखेर शुक्रवारी पीडित व्यक्तीने कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सचिन वामनराव धुले (वय ४०, रा. महाल) यांच्यासोबत तुळशीराम शंकरराव पांडेकर (वय ५६) आणि त्याची पत्नी वंदना तुळशीराम पांडेकर (वय ५०) यांनी कोहळी येथील कोरडवाहू शेतजमीन विकण्याचा साैदा केला. करारनामा केल्यानंतर १० जुलै २०१९ ते १० नोव्हेंबर २०२० या कालावधीत ६ लाख रुपये घेतले. आतापर्यंत शेतजमिनीची विक्री मात्र करून दिली नाही. त्यामुळे धुले यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----