लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीष श्रीवास हत्याकांडातील आरोपी आणि गँगस्टर रणजित सफेलकर टोळीतील कुख्यात गुंड ईसाक मस्ते याच्या गुन्हेशाखेच्या पथकाने मुसक्या बांधण्यात अखेर यश मिळवले. शनिवारी रात्री ईसाक मस्तेला खंडवा (मध्य प्रदेश) जिल्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आज त्याला नागपुरात आणण्यात आले. त्याच्या अटकेमुळे सफेलकर टोळीने केलेल्या आणखी अनेक गुन्ह्यांचा उलगडा होणार आहे.
मार्च २०१२ मध्ये सफेलकरच्या सांगण्यावरून कुख्यात छोटू बागडेने महिला आणल्याचे आमिष दाखवून (हनी ट्रॅपमध्ये अडकवून) मनीष श्रीवासला ईसाक मस्तेच्या गड्डीगोदाममधील घरासमोर नेले. तेथे नंतर मस्ते आणि छोटूने मनीषला पवनगाव (धारगाव)च्या फार्महाऊसवर नेले. आधीच तयारीत असलेल्या सफेलकर, कालू आणि भरत हाटे तसेच बागडे आणि ईसाकने अन्य साथीदारांच्या मदतीने मनीषवर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली. अनडिटेक्ट मर्डरच्या यादीवरची धूळ झटकून पोलीस आयुक्त अमितेशकुमार तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आर्किटेक्ट एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास या दोन्ही हत्याकांडांचा उलगडा केला. निमगडे प्रकरण सीबीआयकडे आहे. त्यामुळे मनीष श्रीवासच्या हत्याकांडात आरोपी कालू आणि शरद हाटे, त्यानंतर सफेलकर टोळीचा म्होरक्या रणजित याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. हाटे बंधू सध्या कारागृहात असून, सफेलकर १२ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडीत आहे. आता ईसाकला पोलिसांनी पकडले. छोटू बागडेलाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
---
अनेक गुन्ह्यांना वाचा फुटली
सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांच्या पापाचे खोदकाम पोलिसांनी सुरू केलेे आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांना वाचा फुटली आहे. याच कडीत सफेलकरचा साथीदार विशाल पैसाडेली याचीही मार्च २००७ मध्ये सफेलकरने हत्या करून अपघाताचा बनाव केला होता. या गुन्ह्यात गँगस्टर राजू भद्रेही सहभागी आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी मिळून अनेक जमिनींवर कब्जा करून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारेही त्यांनी कोट्यवधींच्या जमिनी लाटल्या आहेत. ईसाकच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
-----