लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेसमाेर उभ्या असलेल्या माेटरसायकलला लटकवलेली बॅग चाेरट्याने पळविली. त्या बॅगमध्ये २ लाख ७० हजार रुपये हाेते. हा संपूर्ण घटनाक्रम बॅंक शाखेजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २०) दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडली.
रजत रामराव रहाटे (२३) व व त्याच्या मित्र रुपेश छत्रपाल रहाटे (२३) दाेघेही रा. मंगसा, ता. सावनेर माेटरसायकलने सावनेर शहरात आले हाेते. रजतला अरविंद सहकारी बॅंकेच्या शाखेत २ लाख ७० हजार रुपये जमा करावयाचे असल्याने त्याने ही रक्कम बॅगेत आणली हाेती आणि ती बॅग माेटरसायकलला लटकवली हाेती. रक्कम जमा करण्यापूर्वी दाेघेही भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत पीक कर्जाबाबत चाैकशी करण्यासाठी आले. त्यांनी माेटरसायकल बॅंक शाखेसमाेर उभी केली. रजत बॅंकेत गेला तर रुपेश माेटरसायकलवर बसून हाेता.
काही वेळाने अनाेळखी तरुण तिथे आला. काही कळण्याच्या आत त्याने रकमेची बॅग हळूच काढली आणि ती घेऊन बसस्थानकाच्या दिशेने पळत सुटला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ही बाब लक्षात येताच दाेघांनीही पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे करीत आहेत.