काटाेल : चाेरट्याने भरदिवसा दुकानात प्रवेश केला आणि दुचाकीचे १० नवीन व १५ रिमाेल्ट असे एकूण २५ टायर चाेरून नेले. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढेपठार येथे मंगळवारी (दि. १७) दुपारी घडली.
माेहम्मद जाहीर अन्सारी (४०, रा. मेंढेपठार, ता. काटाेल) यांचे मेंढेपठार येथे टायर विक्री व पंक्चरचे दुकान आहे. ते मंगळवारी कामानिमित्त नागपूरला गेले हाेते. त्यामुळे दुकान दिवसभर बंद हाेते. सायंकाळी परत आल्यावर त्यांना दुकानाचे कुलूप तुटले असल्याने निदर्शनास आले. त्यांनी दुकानाची पाहणी केल्यावर दुचाकीचे १० नवीन व १५ रिमाेल्ट टायर चाेरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. नवीन टायरची किंमत २० हजार रुपये तर, रिमाेल्ट टायर ४,५०० रुपयाचे असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक सुनील ठाेंबरे करीत आहेत.